पिंपरी-चिंचवडमध्ये १२० दिवसांत ४०१ अपघात, ११७ जणांनी गमावला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 09:39 AM2023-05-18T09:39:38+5:302023-05-18T09:39:47+5:30
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीत १२० दिवसांमध्ये तब्बल ४०१ अपघातांची नोंद...
पिंपरी : दररोज अपघाताच्या घटना उघडकीस येत आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीत १२० दिवसांमध्ये तब्बल ४०१ अपघातांची नोंद झाली. त्यावरून प्रत्येक दिवसाला तीनपेक्षा अधिक अपघात होतात, तर प्रतिदिनी एक मृत्यू होत असल्याचे आकडेवारीवरून समोर आले.
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या हद्दीमध्ये १ जानेवारी ते ३० एप्रिल या कालावधीमध्ये प्राणांतिक अपघातांची संख्या १११ एवढी आहे. उर्वरित अपघातांमध्ये नागरिक एकतर गंभीर जखमी झाला आहे, नाही तर त्यास कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे.
अपघाताची अनेक कारणे-
अपघात होण्यास अति वेग हे सर्वांत महत्त्वाचे कारण आहे. त्याशिवाय निष्काळजीपणे वाहन चालवून स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात आणल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.
अपघातप्रवण क्षेत्रांची यादी तयार
पोलिसांनी अपघातप्रवण क्षेत्रांची यादी तयार केली आहे. त्या ठिकाणी दुरुस्तीसाठी बांधकाम विभाग, राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण तसेच महापालिकेला कळविले आहे. काही वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जाते. परिणामी, अपघात होतात.
सर्वाधिक अपघात कोठे?
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग : शहरात सर्वाधिक अपघातांची संख्या ही पुणे-नाशिक महामार्गावर आहे. अतिवेगात गाडी चालविण्यामुळे ही अपघातांची संख्या वाढत आहे. या रस्त्यावर अपघात झाल्यानंतर त्यामध्ये मृत्यू होण्याचीच शक्यता सर्वाधिक असते. वेगावर नियंत्रण असणे आवश्यक आहे.
तळेगाव - चाकण महामार्ग : या मार्गावरही मोठ्या प्रमाणात अपघाताची संख्या वाढलेली आहे. हा रस्ता अरुंद आहे. त्या तुलनेने वाहनांची वर्दळ जास्त आहे. त्यात एमआयडीसीतील अवजड वाहने जास्त आहेत. त्यामुळे सतत अपघात हेातात.
पुणे- मुंबई द्रुतगती महामार्ग : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून दुचाकी, रिक्षा आदी वाहनांना प्रवेश नाही. त्यामुळे या वाहनांची मोठी संख्या महामार्गावर असते. त्यासोबत अवजड वाहनेही मोठ्या संख्येने या महामार्गावर असतात. अतिवेगात तसेच बेशिस्तपणे वाहन चालविल्यामुळे अपघात होतात.
महिना - एकूण अपघात - प्राणांतिक अपघात - मृत्यू - जखमी
जानेवारी - ११० - २६ - २६ - ९०
फेब्रुवारी - ९३ - २५ - २५ - ६५
मार्च - ९४ - २९ - ३२ - ७९
एप्रिल - १०४ - ३१ - ३४ - ७५.
काही वाहनचालक मद्य सेवन करून गाडी चालवितात. प्राणांतिक अपघातांमध्ये दुचाकी अपघाताचे प्रमाण अधिक आहे. नागरिकांनी दुचाकीवर हेल्मेट वापरले पाहिजे.
- सतीश माने, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड