४१ कारखान्यांनी केले ६ कोटी लिटर इथेनॉल उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:38 AM2020-12-17T04:38:02+5:302020-12-17T04:38:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : यंदाच्या गाळप हंगामाच्या पहिल्या महिन्यातच राज्यातील ४१ साखर कारखान्यांनी ६ कोटी लिटर इथेनॉल निर्मिती ...

41 factories produced 60 million liters of ethanol | ४१ कारखान्यांनी केले ६ कोटी लिटर इथेनॉल उत्पादन

४१ कारखान्यांनी केले ६ कोटी लिटर इथेनॉल उत्पादन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : यंदाच्या गाळप हंगामाच्या पहिल्या महिन्यातच राज्यातील ४१ साखर कारखान्यांनी ६ कोटी लिटर इथेनॉल निर्मिती केली आहे. आणखी ३२ कारखाने इथेनॉल उत्पादन घेणार असून त्यामुळे १०८ कोटी लिटर उत्पादनाचे वार्षिक उद्दीष्ट सहज गाठले जाईल असे सााखर उद्योगातील तज्ज्ञांचे मत आहे.

यंदा राज्यात ऊसाचे प्रमाण जास्त आहे. साखरेचे जादा उत्पादन झाल्यास साखरेचे भाव कोसळण्याची भीती आहे. त्यावर उपाय म्हणून १० टक्के म्हणजे १० लाख टन साखर उत्पादन कमी करुन त्याऐवजी इथेनॉल निर्मितीचे धोरण राज्य सरकारने स्विकारले आहे. इथेनॉल निर्मितीला केंद्र सरकारनेही प्रोत्साहन दिले असून इथेनॉल उत्पादन प्रकल्प ऊभारणीच्या कर्जावरील व्याजावर अनुदान देऊ केले आहे.

यंदा हंगामाच्या पहिल्याच महिन्यात ६ कोटी लिटर इथेनॉल उत्पादन साखर कारखान्यांनी घेतले. बी मोलेसीस (साखर असलेली मळी), सी मोलेसीस (साखर नसलेली मळी) याशिवाय शुगर सिरप व शुगर ज्यूस या ४ पद्धतीने इथेनॉल निर्मिती होत आहे. गेल्या वर्षी राज्याने १८ कोटी लिटर इथेनॉल उत्पादन घेतले. केंद्र सरकारने राज्याला यंदा १०८ कोटी लिटर इथेनॉलचे उद्दीष्ट दिले आहे. कारखान्यांनी सध्याचा वेग कायम राखला तर हे उद्दीष्ट यंदाच्या हंगामात ओलांडले जाण्याची शक्यता साखर आयुक्तालयातील सूत्रांनी व्यक्त केली.

चौकट

“राज्यातील साखर कारखानदारीला वळण देणारे अनेक बदल येत्या काही वर्षात होतील. जगभरात सगळीकडे इंधनाला पर्याय म्हणून इथेनॉलला वाढती मागणी आहे. त्या तुलनेत आरोग्यविषयक जागृतीमुळे आहारातून साखरेचे महत्व कमी होत आहे. राज्यातलाच नव्हे तर देशातील साखर उद्योग ब्राझीलच्या वळणावर जाईल असे दिसते.”

-शेखर गायकवाड, साखर आयुक्त, महाराष्ट्र.

Web Title: 41 factories produced 60 million liters of ethanol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.