अबोला धरल्याने 41 वर्षीय प्रियकराचा प्रेयसीच्या घरासमोर धिंगाणा; खडकीतला प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 11:05 IST2023-01-30T11:05:23+5:302023-01-30T11:05:40+5:30
प्रियकराविरोधात गुन्हा दाखल...

अबोला धरल्याने 41 वर्षीय प्रियकराचा प्रेयसीच्या घरासमोर धिंगाणा; खडकीतला प्रकार
पुणे/ किरण शिंदे : दीड वर्षापासून प्रेम संबंध, मात्र मागील तीन दिवसांपासून प्रेयसीने अबोला धरल्याने प्रियकराने तिच्या घरासमोर जात धिंगाणा घातला. खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भाऊ पाटील रस्त्यावरील एका उच्चभ्रू सोसायटीच्या खाली हा रविवारी रात्री हा प्रकार घडला. प्रेयसी खाली येत नाही म्हटल्यावर आरोपीने तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या संपूर्ण प्रकारानंतर प्रेयसीने खडकी पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. खडकी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी प्रियकराला सीआरपीसी 149 प्रमाणे नोटीस दिली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, यातील प्रेयसी 29 वर्षाची तर प्रियकर 41 वर्षाचा आहे. मागील दीड वर्षापासून त्यांच्यात प्रेम संबंध आहेत. मात्र मागील दोन ते तीन दिवसांपासून फिर्यादी या आरोपीसोबत बोलत नव्हत्या. आरोपी प्रियकराने फिर्यादी सोबत बोलण्याचा अनेकदा प्रयत्न केला. प्रेयसीच्या मोबाईलवर फोनही केले. मात्र तिने त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर सटकलेल्या प्रियकराने थेट प्रेयसीचे घर गाठले. रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ती राहत असलेल्या सोसायटीच्या खाली जाऊन त्याने धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. तरीसुद्धा ती बोलत नाही म्हटल्यावर आरोपीने तिला शिवीगाळ केली. प्रियकराच्या या धिंगारानंतर प्रेयसीने खडकी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी ही गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.