इंदापूर तालुक्यातील रस्त्यांसाठी ४१३ कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:10 AM2021-01-17T04:10:53+5:302021-01-17T04:10:53+5:30
इंदापूर: इंदापूर तालुक्यातील सात ठिकाणच्या रस्त्यांच्या कामांसाठी ४१३ कोटी २६ लाखांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम ...
इंदापूर: इंदापूर तालुक्यातील सात ठिकाणच्या रस्त्यांच्या कामांसाठी ४१३ कोटी २६ लाखांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. कोरोनानंतरच्या काळात झालेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून राज्यमंत्री भरणे यांनी सदरचा निधी मंजूर करून घेतला आहे
या निधीतून भिगवण - खानोटा ते बारामती रस्त्यासाठी २१७ कोटी ६८ लाख, भवानीनगर ते शेटफळगढे ते खडकी रस्त्यासाठी १७३ कोटी ५८ लाख निधी मंजूर केला आहे. या दोन्ही रस्त्यांचे रुंदीकरण होणार असल्याने दळणवळण सुलभ व जलद होणार आहे. प्रामुख्याने भवानीनगर ते खडकी रस्त्यामुळे इंदापूर व बारामती तालुक्यातील नागरिकांना पुण्याला जाण्यासाठी पुणे - सोलापूर हायवेचे अंतर कमी होणार असल्याने नागरिकांचा वेळ वाचणार आहे. तर भिगवण-बारामती रस्त्यामुळे वाहतूकीची कोंडी कमी होणार असून, प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. याशिवाय तालुक्यातील बोरी ते शेळगाव रस्त्यासाठी ६ कोटी, अंथूर्णे ते भरणेवाडी ते बिरंगुडवाडी रस्त्यासाठी ५ कोटी, कर्मयोगी साखर कारखाना ते निमगाव केतकी रस्त्यासाठी ३ कोटी, पुणे-सोलापूर हायवे ते बाभूळगाव-भाटनिमगाव ते भांडगाव रस्त्यासाठी ३ कोटी व इंदापूर ते बेडशिंगे ते अवसरी ते भांडगाव रस्त्यासाठी ५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे गेल्या पाच दशकांपासून रस्त्यासाठी वंचित असलेल्या खेडोपाडयातील नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात अधिक गाळप क्षमता असलेला कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचा रस्ता अत्यंत महत्त्वाचा ऊस वाहतुकीसाठी समजला जातो. कर्मयोगी सहकारी साखर कारखाना ते निमगाव केतकी या रस्त्यासाठी तीन कोटीचा निधी मंजूर केलेला आहे. यामध्ये हा रस्ता अत्यंत अद्ययावत पद्धतीने मजबूत केला जाणार असल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
पहिल्या टप्प्यातच तालुक्यासाठी विक्रमी निधी खेचला
सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक गावोगावी जोडणारे रस्ते खास निधी टाकून परिपक्व केले होते. मात्र आता भरणे हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे राज्यमंत्री आहेत. त्यांना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक रस्ता अद्यावत करण्यासाठी ते परिश्रम घेत आहेत. चारशे तेरा कोटीचा पहिल्या टप्प्यातच निधी तालुक्याच्या पदरात पाडलेला आहे.