४२ कोटी लिटर पाणी एका पावसात मुरणार
By admin | Published: May 30, 2017 02:09 AM2017-05-30T02:09:48+5:302017-05-30T02:09:48+5:30
‘सत्यमेव जयते’ वॉटर कप स्पर्धेत दीड महिन्याच्या कालावधीत सुमारे ४ लाख २० हजार घनमीटर एवढे प्रचंड जलसंधारणाचे
लोकमत न्यूज नेटवर्क
जेजुरी : ‘सत्यमेव जयते’ वॉटर कप स्पर्धेत दीड महिन्याच्या कालावधीत सुमारे ४ लाख २० हजार घनमीटर एवढे प्रचंड जलसंधारणाचे काम झाले असून एका पावसात ४२ कोटी लिटर पाणी मुरणार आहे. यामुळे या ३३ गावांतील ग्रामस्थांना आता पावसाची प्रतीक्षा आहे. यातून जलसंधारणाचे काम झालेच, शिवाय मन संधारणाचेही मोठे काम झाले आहे.
या स्पर्धेसाठी पुरंदर व इंदापूर या दोन तालुक्यांची निवड करण्यात आली होती. पुरंदर तालुक्यातील सुमारे ३३ गावांनी स्पर्धेत सहभाग घेतला आहे. सिनेअभिनेते आमिर खान यांच्या या उदात्त संकल्पनेतून गाव पाणीदार करण्यासाठी गेल्या ८ एप्रिलपासून पुरंदर तालुक्यात शासनाला जे चार वर्षांत जमले नाही त्यापेक्षा मोठे काम उभे राहिले आहे. ग्रामस्थांचा लोकसहभागही दिसून आला. नुकतीच २२ मे रोजी ही स्पर्धा संपली. ३३ गावांनी सहभाग घेतला असला तरीही यातील साकुर्डे, पोखर, वाघापूर, आंबळे, मावडी क. प., चांबळी, पांगारे, हरणी, केतकावळे, बोऱ्हाळवाडी, मांढर या गावांनी रस दाखवला होता. स्पर्धेसाठी असणारी प्रश्नपत्रिका सोडवली आहे. यात लोकसहभागाबरोबरच मनुष्यबळ व यांत्रिक मशिनरीद्वारे कामे झाली आहेत. भारतीय जैन संघटनेने अनेक गावांना यंत्रासामग्री पुरवली होती. ग्रामस्थांची लोकवर्गणी तसेच काही सामाजिक संस्थांनी तसेच उद्योजकांनी आर्थिक मदतही केली होती. विशेष म्हणजे अधिकाऱ्यांनी गावे दत्तक घेतली होती. मात्र त्यांच्याकडून ग्रामस्थांसोबत श्रमदानाव्यतिरिक्त एक रुपयाचीही मदत होऊ शकलेली नाही, उलट श्रमदानाचा फार्सच जास्त करून ग्रामस्थांना खर्चात पाडण्याचेच काम झाले आहे. ग्रामस्थांनी जिद्दीने व चिकाटीने गाव पाणीदार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी केलेल्या कामाचे फलित पाऊस पडल्यानंतरच दिसणार आहे.
कोठे एकट्याची लढाई तर कुठे शेकडोंचा सहभाग
काही गावांनी खूप मोठे काम केले तर काही गावातून शक्य होईल तेवढे काम करण्याचा प्रयत्न केला आहे. कोठे एकट्याची लढाई तर कुठे शेकडो ग्रामस्थांचा सहभाग दिसत होता. यातून त्यांच्या जिद्दीचे दर्शन होत होते.
दीड महिन्याच्या कालावधीत सलग समतल चर, कंपार्टमेंट बंडिंग, अनगड दगडी बांध, पाझर तलाव, नालेदुरुस्ती, नांदेड टाईप शोष खड्डे, प्रतिमाणसी वृक्ष लागवडीसाठी खड्डे, बांधबंदिस्ती आदींसारखी कामे केली आहेत. यातून पावसाचे पाणी जिरवण्याचे काम मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले आहे.
गावाच्या शिवारातच हे पाणी राहणार
सर्व गावातील अधिकृत नोंदीनुसार ४ लाख २० हजार घनमीटर एवढे काम झालेले आहे. पाऊस पडला तर सुमारे ४२ कोटी लिटर पाणी एका पावसात जमिनीत मुरणार आहे. तेवढा एका वेळी साठा होणार आहे. आता गावागावांतून पावसाची प्रतीक्षा सुरू झाली आहे, असे पाणी फाऊंडेशनचे पुरंदर तालुका समन्वयक सुरेश सस्ते यांनी सांगितले.