Pune: नोकरीच्या आमिषाने चौघांची फसवणूक, तब्बल ४२ लाखांचा गंडा
By भाग्यश्री गिलडा | Published: November 2, 2023 03:36 PM2023-11-02T15:36:49+5:302023-11-02T15:38:52+5:30
एकाच दिवसात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये फिर्याद दाखल करण्यात आल्या आहेत....
पुणे : पार्टटाइम जॉबचे आमिष दाखवून पुण्यातील चौघांची फसवणूक केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी (दि. ०१) एकाच दिवसात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये फिर्याद दाखल करण्यात आल्या आहेत.
पहिल्या घटनेमध्ये लोहगाव परिसरात राहणाऱ्या मितेश मदनदास गुजराथी (३६) यांनी पोलिसात फिर्यादी दिली. त्यांना अनोळखी क्रमांकावरून पार्टटाइम नोकरी करण्यासाठी व्हाॅट्सॲपवर मेसेज आला. पार्टटाइम नोकरीसाठी सहमत असल्याचे सांगितल्यावर त्यांना एका टेलिग्राम ग्रुपमध्ये ॲड करण्यात आले. वेगवेगळे टास्क देऊन ते पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगितले. सुरुवातीला काही प्रमाणात मोबदला देऊन तक्रारदार यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर प्रीपेड टास्क, व्हीआयपी टास्क अशी वेगवेगळी कारणे सांगून तक्रारदार यांच्याकडून तब्बल २२ लाख ८२ हजार रुपये उकळले. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेमध्ये धनकवडी परिसरात राहणाऱ्या पुरुषोत्तम शंकर गोणे (२९) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पार्ट टाईम जॉब देण्याचे आमिष दाखवून त्यांची ८ लाख १५ हजारांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसऱ्या घटनेमध्ये बिबवेवाडी परिसरात राहणाऱ्या कार्तिक हरीश गांधी (२७) यांची ५ लाख ८५ हजार रुपये भरण्यास सांगून कोणताही परतावा न देता फसवणूक झाली आहे. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौथ्या घटनेमध्ये, वाघोली परिसरात राहणाऱ्या आशुतोष राजेश हुपरे (३१) यांना चांगला मोबदला मिळेल असे आमिष दाखवून ५ लाख २३ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. प्रत्यक्षात नफ्याचे पैसे काढायला गेल्यावर पैसे निघत नाहीत, असे आल्याने विचारणा केली असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि तक्रारदार यांना ग्रुपमधून काढून टाकण्यात आले. याप्रकरणी अज्ञात टेलिग्राम आयडीधारकाविरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.