पुणे जिल्हा परिषदेच्या प्रारूप गट रचनेवर ४२ हरकती दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 06:08 PM2022-06-08T18:08:29+5:302022-06-08T18:10:02+5:30
आंबेगाव व मावळ तालुक्यांतून एकही हरकत आलेली नाही...
पुणे : जिल्हा परिषदेच्या प्रारूप गट रचनेवर हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत बुधवार (८ जून) असून, मंगळवारपर्यंत नागरिकांनी एकूण ४२ हरकती दाखल केल्या आहेत. त्यात सर्वाधिक ८ हरकती भोर तालुक्यातून आल्या आहेत. आंबेगाव व मावळ तालुक्यांतून एकही हरकत आलेली नाही. मात्र, प्रारूप रचनेची माहिती, आराखडे तसेच आयोगाने ठरवून दिलेल्या निकषांची माहिती मिळण्यासाठी वेळ लागत असल्याने हरकती दाखल करण्यास वेळ वाढवून देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
जिल्हा परिषदेच्या गट आणि गण यांची २ जून रोजी प्रारूप प्रसिद्धी करण्यात आली. नागरिकांना ती ३ जून रोजी पाहण्यास मिळाली. त्यानंतर सलग दोन सुट्या आल्या. परिणामी प्रशासनाकडून गट आणि गणांबद्दल लोकसंख्या, नैसर्गिक हद्दी तसेच, नकाशे यांची माहिती तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयातून घ्यावी लागत आहे. त्यामुळे अपुऱ्या माहितीच्या आधारे हरकती आणि सूचना दाखल करता येत नसल्याने नागरिकांना अडचण येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी दहा, तर मंगळवारी ३२ हरकती दाखल करण्यात आल्या. तसेच राज्य निवडणूक आयोगाने मुदत वाढवून द्यावी, अशी मागणीही होत आहे.
दाखल हरकतींची संख्या
तालुका हरकती
वेल्हे ३
भोर ८
पुरंदर ३
दौंड ५
इंदापूर ७
बारामती १
जुन्नर ६
आंबेगाव ०
खेड ६
शिरूर १
मावळ ०
मुळशी १
हवेली १