अतिवृष्टीग्रस्तांसाठी राज्य सरकारचे ४३ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:12 AM2021-01-20T04:12:43+5:302021-01-20T04:12:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : अतिवृष्टीग्रस्तांना राज्य सरकारकडून होणाऱ्या मदतीचा दुसरा टप्पा जिल्ह्याला मिळाला. पहिल्या टप्प्यात ४४ कोटी रुपयांचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अतिवृष्टीग्रस्तांना राज्य सरकारकडून होणाऱ्या मदतीचा दुसरा टप्पा जिल्ह्याला मिळाला. पहिल्या टप्प्यात ४४ कोटी रुपयांचे वाटप झाले होते. आता दुसऱ्या टप्प्यात ४३ कोटी रुपये प्रशासनाला मिळाले असून वाटप लवकरच सुरू होईल.
सप्टेंबर-ऑक्टोबर २०२० मध्ये जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. त्यात १ लाख ९८ हजार ८१८ शेतकरी बाधित झाले. एकूण ७८ हजार हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले. अतिपावसात शेतजमीनच खराब झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ४ हजारपेक्षा जास्त होती. त्यांनाही जमेस धरून जिल्हा प्रशासनाने सरकारकडे ८७ कोटी रूपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली होती.
जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे १५ हजार १९० हेक्टरचे नुकसान पुरंदर तालुक्यात झाले असून, ३२ हजार २५१ शेतकऱ्यांना फटका बसला. सर्वात कमी ४२३ हेक्टर नुकसान वेल्हे तालुक्यात होते. राज्य सरकारने यंदा जिरायती व बागायती शेतीसाठी प्रत्येकी प्रतिहेक्टर १० हजार रूपये व फळबागांसाठी प्रतिहेक्टर २५ हजार रुपये दिले. जास्तीत जास्त दोन हेक्टर क्षेत्र आणि ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असेल तरच मदत दिली जाते.