कंपनीत काम देण्याचे आमिष दाखवून २०३ कलावंतांची ४३ लाखांची फसवणूक
By विवेक भुसे | Published: May 17, 2023 04:39 PM2023-05-17T16:39:24+5:302023-05-17T16:39:33+5:30
११७ फोटोग्राफर्स, ५१ मेकअप आर्टिस्ट, २० मॉर्डल्स, ६ स्टायलिस्ट, ९ हेड असे तब्बल २०३ कलावंत
पुणे : दिवसाला ५ ते ७ हजार रुपये कमवा, अशी जाहिरात करुन सबस्क्रिप्शनसाठी तरुणांकडून पैसे घेऊन २०३ जणांची तब्बल ४३ लाख ९३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. मेकअप आर्टिस्ट, हेअर स्टायलिस्ट, फोटोग्राफर, मॉडेल डिझायनर अशा क्षेत्रात करियर करु इच्छिणाऱ्या तरुण तरुणींचा यामध्ये समावेश आहे. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी श्रद्धा चंद्रकांत अंदुरे, योगेश मदनलाल मुंदडा (दोघे रा. औरंगाबाद), जय पंकज चावजी, शुभम जयप्रकाश पगारे, अनिरुद्ध बिपीन रासणे (रा. कोथरुड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एका मेकअप ऑर्टिस्ट असलेल्या महिलेने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार कोथरुडमधील भुसारी कॉलनीतील क्लिक अँड ब्रुश कंपनीमध्ये ९ मार्च २०२३ ते ६ मे २०२३ दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्या कंपनीत दिवसाला ५ ते ७ हजार रुपये कमवा, अशी सोशल मीडियावर जाहीरात केली. फिर्यादी यांनी कंपनीच्या प्रमुख श्रद्धा अंदुरे यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी आमच्या कंपनीला एका कंपनीकडून ई -कॉमर्सचे काम मिळाले आहे. कंपनीमध्ये काम करणाऱ्यांना ३ महिन्यांसाठी ४४२५ रुपये किंवा २ वर्षांसाठी १७ हजार ७०० रुपये सबक्रिप्शन करावे लागले असे सांगितले. फिर्यादींनी ३ महिन्यांचे सबक्रिप्शन घेतले. त्यानंतर त्यांचा २०३ जणांचा ग्रुप तयार करण्यात आला. त्यांचे १६ मार्च रोजी द पुणे स्टुडिओ येथे ब्रिफिंग घेतले. २१ मार्चपासून काम सुरु होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर २९ मार्च रोजी कंपनी अडचणीत असून काम बंद केल्याचे सांगितले. कामाचे व सबस्क्रिप्शनचे पैसे परत करण्याचे आश्वासन देऊन त्यांची तात्पुरती समजूत काढली. वेळोवळी वेगवेगळी कारणे सांगून त्यांची दिशाभूल केली. शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या सर्वांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. पोलिसांना आतापर्यंत २३ जणांची ४३ लाख ९३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे अर्ज मिळाले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत.
११७ फोटोग्राफर्स, ५१ मेकअप आर्टिस्ट, २० मॉर्डल्स, ६ स्टायलिस्ट, ९ हेड अशा २०३ जणांची सबक्रिप्शन व केलेले कामाची रक्कम सुमारे ४३ लाख ९३ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.