अपघातात ४३ वारकरी जखमी
By admin | Published: June 18, 2017 03:27 AM2017-06-18T03:27:06+5:302017-06-18T03:27:06+5:30
श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथून दर्शन घेऊन परतताना वारकऱ्यांच्या टेम्पो ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा ताबा सुटल्याने पलटी होऊन झालेल्या अपघातात ४३ वारकरी
- लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव दाभाडे : श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथून दर्शन घेऊन परतताना वारकऱ्यांच्या टेम्पो ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा ताबा सुटल्याने पलटी होऊन झालेल्या अपघातात ४३ वारकरी जखमी झाले. त्यातील चार गंभीर आहेत.
हा अपघात भंडारा डोंगर रस्त्यावरील उतारावर शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास झाला. सुदैवाने अपघातग्रस्त टेम्पो संरक्षक भिंतीला अडकल्याने पुढील अनर्थ टळला. जखमींमध्ये २३ महिला, १६ पुरुष व ४ मुले अशा एकूण ४३ जणांचा समावेश आहे. बहुतेक वारकरी हे बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील आहेत.
टेम्पो पलटी होताच स्थानिक व दर्शनासाठी आलेल्या अन्य भाविकांनी बचावकार्य सुरू केले. घटनास्थळी पोलीस व रुग्णवाहिका त्वरित दाखल झाली. जखमींना तळेगाव स्टेशन व सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमाटणे येथील रुग्णालयात दाखल केलेल्या वारकऱ्यांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचे डॉ. राहुल बढे यांनी सांगितले.
तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामदास इंगवले यांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक गोपाळ संतोष नवले (वय २५, रा. खंडाळा, ता. मेहकर, जि. बुलडाणा) हे त्यांच्या टेम्पोमधून (एमएच २८ बी ९८८१) दिंडीतील ४५ भाविक घेऊन पंढरपूरला निघाले होते. श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे दर्शन घेऊन पंढरपूरला निघाले असताना, डोंगर उतारावर हा अपघात झाला. ब्रेक निकामी झाल्याने चालक नवले यांचा टेम्पोवरील ताबा सुटल्याने टेम्पो रस्त्याच्या बाजूला पलटी झाला.