पुण्यातील महालोकअदालतमध्ये ४४ हजार ७०१ दावे निकाली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 03:05 AM2019-03-19T03:05:28+5:302019-03-19T03:05:43+5:30
पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने रविवारी पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या महालोकअदालतमध्ये ४४ हजार ७०१ दावे निकाली काढण्यात आले आहेत.
पुणे : पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने रविवारी पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या महालोकअदालतमध्ये ४४ हजार ७०१ दावे निकाली काढण्यात आले आहेत. त्यापैकी ४१ हजार ११६ खटले दाखलपूर्व आहेत. तर उर्वरित ३ हजार ५८५ दावे प्रलंबित स्वरूपाचे आहेत. राज्यात सर्वाधिक दावे पुणे जिल्ह्यात निकाली काढण्यात आले आहे़ या दाव्यात ६७ कोटी २१ लाख ६८ हजार १३५ रुपये नुकसानभरपाई देण्यात आली आहे.
विधी सेवाचे सचिव चेतन भागवत यांनी या महालोकअदालतीतील झालेल्या कामकाजाची माहिती दिली़
पुणे जिल्ह्यातील न्यायालयात रविवारी झालेल्या महालोकअदालतमध्ये १ लाख ४२ हजार७३८ दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. त्यामध्ये २४ हजार ५९९ प्रलंबित दावे तर, १ लाख १८ हजार १३९ दाखलपूर्व स्वरुपाचे दावे होते़ निकाली काढण्यात आलेल्या प्रलंबित दाव्यात किरकोळ फौजदारी स्वरूपाचे १ हजार १९, धनादेश न वटल्याचे १ हजार २७७, बँकांशी संबंधी १०७, मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे २८१, कामगार वाद ६९, वीज, पाणीपट्टी संदर्भात ५३, कौटुंबिक वादासंबंधी १८३, जमिन वादासंबंधी ३७७ आणि इतर ४६८ दाव्यांचा समावेश आहे. या सर्व दाव्यात मिळून ३८ कोटी ५१ लाख ३४ हजार ७०० रुपये नुकसानभरपाई देण्यात आली आहे.
तडजोड झालेल्या दाखलपूर्व दाव्यात बँक रिकव्हरीचे ३ हजार ३९६, वीज आणि पाणीपट्टीच्या ३३ हजार ५२० आणि इतर ४ हजार २०० दाव्यांचा समावेश आहे. या दाव्यात २८ कोटी ७० लाख ३३ हजार ४३५ रुपये नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे.