जिल्ह्यातील 590 खाजगी हॉस्पिटल्सना 4 हजार 455 रेमडेसिविर इंजेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:11 AM2021-04-27T04:11:29+5:302021-04-27T04:11:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे जिल्ह्यासाठी सोमवारी (दि.26) रोजी 4 हजार 455 रेमडेसिविर इंजेक्शन्सच्या व्हायल्स उपलब्ध झाले. जिल्हा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे जिल्ह्यासाठी सोमवारी (दि.26) रोजी 4 हजार 455 रेमडेसिविर इंजेक्शन्सच्या व्हायल्स उपलब्ध झाले. जिल्हा प्रशासनाने उपलब्ध झालेल्या इंजेक्शन्सचे जिल्ह्यातील 590 खाजगी हाॅस्पिटल्सला त्याच्या वापरात असलेल्या ऑक्सिजन व आयसीयू बेड्सच्या 40 टक्के कोटा निश्चित करून वितरण करण्याचे आदेश वितरकांना दिले. यानुसार पुणे शहरातील 146 हाॅस्पिटल्सला 1 हजार 873, पिंपरी-चिंचवड शहरातील 91 हाॅस्पिटल्सला 938, कॅन्टोन्मेंट मध्ये 10 हाॅस्पिटलला 82 आणि ग्रामीण भागात 195 हाॅस्पिटल्सला 1 हजार 562 रेमडेसिविर इंजेक्शन्स व्हायल्स वाटप करण्यात आले.
पुणे जिल्ह्यात 590 खाजगी हॉस्पिटल्सना आता पर्यंत 53 हजार 9 इतके रेमडेसिविर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण करणेत आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. त्यापैकी रेमडेसिविर इंजेक्शन्स व्हायल्स 25 एप्रिल व 26 एप्रिल 2021 रोजी या दोन दिवसात जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांना आक्सिजन बेडच्या संख्येनुसार रेमडेसिविर इंजेक्शन्सच्या व्हायल या पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, कॅन्टोन्मेंट क्षेत्र व ग्रामीण क्षेत्रातील हॉस्पिटल्सला वितरित करण्यात आल्या आहेत. संबंधित कोविड रूग्णालयांनी औषधसाठा प्राप्त करून घेण्यास रूग्णालयाच्या लेटर हेडवर सही शिक्क्यासह प्राधिकारपत्र व प्राधिकृत व्यक्तीचे फोटो ओळखपत्र घाऊक विक्रेत्याकडे सादर करणे आवश्यक आहे.
पुणे, पिंपरी महानगरपालिका, पुणे छावणी परिषद, पुणे ग्रामीण, नगरपालिका प्रशासन व नगर पंचायतसह आयुक्त औषध व प्रशासन यांनी प्राधिकृत केलेल्या आरोग्य अधिकारी यांनी नियंत्रण करणेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. दररोज प्राप्त झालेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचे रूग्णालयनिहाय वाटप करण्यात येऊन केलेल्या वाटपाची हॉस्पिटलनिहाय रेमडेसिविर इंजेक्शन्सच्या संख्येसह व वितरकाच्या नाव व मोबाईल क्रमांकासह यादी नागरीकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय पुणेच्या pune.gov.in व https://pune.gov.in/corona-virus-updates/. या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.