मालमत्तेच्या हव्यासापोटी भावाचा काटा काढण्यासाठी दिली ४५ लाखांची सुपारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 03:12 PM2022-12-18T15:12:33+5:302022-12-18T15:12:46+5:30
पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली
पिंपरी : मालमत्तेच्या हव्यासापोटी सख्ख्या चुलत भावानेच भावाचा काटा काढण्यासाठी ४५ लाखांची सुपारी दिली. मात्र, आरोपींनी जुन्या भांडणाची खुन्नस काढत पिंपरी येथे पत्राशेड व भाटनगर तसेच बौद्धनगर येथे हवेत गोळीबार केला. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. त्यांना खुनाची सुपारी देण्यात आल्याचे तपासात समोर आले.
शाहरुख शेख (वय २९, रा. गुलाबनगर, दापोडी), मोहम्मद अलवी (वय २६, रा पवारवस्ती, दापोडी), फारूक शेख (वय २७, रा. पत्राशेड झोपडपट्टी, चिंचवड), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पिंपरी येथे येथे ६ डिसेंबर रोजी तीन आरोपींनी हवेत गोळीबार केल्याची घटना घडली. पोलिसांनी आरोपींना अटक करून तपास केला असता खुनाच्या सुपारीचे प्रकरण समोर आले. नऊ आरोपी मिळून माणच्या माजी सरपंच विमल मोहिते यांचा मुलगा व ग्रामपंचायतचा माजी सदस्य संतोष मोहिते यांचा खून करणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अनिल मोहिते याने आरोपींना ४५ लाखांची सुपारी दिल्याची कबुली आरोपींनी दिली.
आरोपी अनिल मोहिते याने आरोपी मोहम्मद अलवी याच्यासह त्याच्या साथीदारांना ताथवडे येथे बोलवून तीन लाख रुपये रोख दिले. त्यानंतर आरोपींनी उत्तर प्रदेश येथून पिस्तूल व राउंड विकत घेतले. त्यानंतर आरोपी अलवी याने जुन्या भांडणाची खुन्नस काढत आरोपी शाहरुख आणि फारुख यांच्यासोबत पिंपरी येथे हवेत गोळीबार केला. त्यामुळे संतोष मोहिते यांच्या हत्येचा डाव फसला. आरोपी अनिल मोहिते आणि संतोष मोहिते हे सख्खे चुलत भाऊ आहेत. त्यांच्यात शेतीचा वाद सुरू आहे. यातूनच आरोपी अनिल मोहिते याने संतोष यांच्या खुनाची सुपारी दिली. याची कुणकुण लागल्याने संतोष यांनी पोलिस संरक्षण मागितले. खुनाची सुपारी दिल्याचा प्रकार समोर आल्यानंतर संतोष मोहिते यांना पोलिस संरक्षण दिले.