चार तासांत जमा झाला ४५ टन कचरा

By admin | Published: August 29, 2016 03:35 AM2016-08-29T03:35:36+5:302016-08-29T03:35:36+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने राबविण्यात आलेल्या सामाजिक रक्षाबंधन-संदेश पर्यावरणाचा या महाअभियानात रविवारी, ४४ केंद्रे व १७३ हून अधिक उपकेंद्रांवर

45 tons of garbage accumulated in four hours | चार तासांत जमा झाला ४५ टन कचरा

चार तासांत जमा झाला ४५ टन कचरा

Next

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने राबविण्यात आलेल्या सामाजिक रक्षाबंधन-संदेश पर्यावरणाचा या महाअभियानात रविवारी, ४४ केंद्रे व १७३ हून अधिक उपकेंद्रांवर एकाच दिवशी सकाळी ९ ते दुपारी १ या चार तासांतच ४५ टनांहून अधिक प्लॅस्टिक व ई-कचरा संकलित करून शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी पाठविण्यात आला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विविध शैक्षणिक व सामाजिक संस्था, संघटनांतर्फे १८ आॅगस्ट २०१६ पासून संपूर्ण पुणे शहरात प्लॅस्टिक व ई-कचरा निर्मूलनासाठी हे महाअभियान राबविण्यात आले. या महाअभियानातून ३ लाखांहून अधिक घरांपर्यंत तर सुमारे पंधरा लाखांहून अधिक पुणेकरांशी संपर्क साधून पर्यावरण जागृती करण्यात आली होती. या महाअभियानात प्लॅस्टिक व ई-कचऱ्याविषयी संघाचे स्वयंसेवक व विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन राखी बांधून प्लॅस्टिक व ई-कचऱ्याविषयी जनजागृती केली. या महाअभियानाला पुणे शहरातील सर्वच स्तरांतून मोठा प्रतिसाद मिळाला.
रविवारी सुटीच्या दिवशी शहरातील सर्व ४४ केंद्र व १७३ उपकेंद्रांवर सकाळपासून नागरिकांनी गर्दी करून त्यांच्या घरातील प्लॅस्टिक व ई-कचरा आणून जमा केला. या वेळी नागरिकांना संघातर्फे कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वाखाली शहरातील लोकप्रतिनिधी ७०हून अधिक संस्था, संघटना व बँका या महाअभियानात सहभागी झाल्या होत्या. १० दिवसांच्या अभियानातून सुमारे पंधरा हजारांहून अधिक संघ कार्यकर्ते, दीड लाखांहून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यात सक्रिय सहभागी होते.
याविषयी पुणे महानगराचे संघचालक रवींद्र वंजारवाडकर म्हणाले, समाजापुढचे विविध प्रश्न, समाजालाच पुढे येऊन सोडवावे लागणार आहेत, त्यादृष्टीनेच हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या महाअभियानाचे प्रमुख राजन गोऱ्हे यांनी सहभागानिमित्त पुणेकरांचे आभार मानले. अभियानात शहरातील अनेक शैैक्षणिक संस्था, बँकांनी सहभाग घेतला होता.
या महाअभियानाच्या निमित्ताने मागील दहा दिवसांत रा. स्व. संघातर्फे शहराच्या विविध भागांत चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रप्रदर्शनी आदी उपक्रमांद्वारेदेखील जनजागृती करण्यात आली. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने या विषयावर एकदिवसीय परिसंवाद, महर्षी स्त्रीशिक्षण संस्थेतर्फे परिसंवाद, शिक्षण प्रसारक मंडळीच्या शाळांतर्फे प्रचार फेरी तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गरवारे महाविद्यालयाच्या वतीने पथनाट्ये सादर करण्यात आली.

Web Title: 45 tons of garbage accumulated in four hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.