भामा आसखेडच्या ३२३ प्रकल्पग्रस्तांना ४५ कोटींचे वाटप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 08:04 PM2020-01-29T20:04:28+5:302020-01-29T20:08:29+5:30

प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतरच शहरांना पाणी पुरवठा मिळणे शक्य होणार अद्याप ५५६ प्रकल्पग्रस्तांना निधीचे १४४.१२ कोटी रुपये देणे शिल्लक

45crore allotted to the project victims of Bhama Askhed | भामा आसखेडच्या ३२३ प्रकल्पग्रस्तांना ४५ कोटींचे वाटप

भामा आसखेडच्या ३२३ प्रकल्पग्रस्तांना ४५ कोटींचे वाटप

googlenewsNext
ठळक मुद्देपुणे महापालिकेच्या आयुक्त शेखर गायकवाड घेणार आज आढावा बैठकअद्याप ५५६ प्रकल्पग्रस्तांना निधीचे १४४.१२ कोटी रुपये देणे शिल्लक

पुणे : पुणे शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी महत्वाचा व गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भामा आसाखेडचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त शेखर गायकवाड यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी गुरुवार (दि.३०) रोजी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित केली आहे. भामाआसखेडच्या ३२३ प्रकल्पग्रस्तांना आता पर्यंत ४५ कोटींचे वाटप केले आहे. अद्याप ५५६ प्रकल्पग्रस्तांना निधीचे वाटप शिल्लक आहे. यासाठी १४४.१२ कोटी रुपये देणे शिल्लक आहे. प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतरच शहरांना पाणी पुरवठा मिळणे शक्य होणार आहे. 
जिल्हा पुनर्वसन अधिकारी भारत वाघमारे यांनी सांगितले की, सन १९८९ मध्ये भामा आसखेड प्रकल्प मंजूर करताना शेती सिंचन हाच मुख्य उद्देश होता. परंतु शासनाने पुमे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि औद्योगिक विकास महामंडळ या संस्थांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी धरणाचे सिंचन क्षेत्र रद्द करुन केवळ पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षण निश्चित केले. धरणाचे सिंचन क्षेत्र रद्द झाल्याने प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर या संदर्भांत पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि तत्कालीन पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी बैठक घेऊन प्रकल्पग्रस्तांना जमिनीच्या बदल्यात हेक्टरी १५ लाख रुपये मोबदला देण्याचा निर्णय घेतला. यासाठी राज्य शासनाने ८ मार्च २०१९ रोजी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दोन्ही महापालिकांनी आपल्या पाण्याच्या मंजूर कोट्याच्या हिश्यानुसार प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसनाचा कर्च आदा करण्याचे आदेश दिले. 
पुणे महापालिकेला भामा आसखेड प्रकल्पातून २.६४ टीएमसी आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी २.१२ टीएमसी पाण्याचा कोटा मंजूर केला आहे. त्यानुसार पुणे महापालिकेने १३० कोटी ३३ लाख रुपये आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने १०४ कोटी ६७ लाख रुपये जिल्हा पुनर्वसन अधिकाºयांना प्रकल्पग्रस्तांना वाटपासाठी देणे आवश्यक आहे. आता पर्यंत पुणे महापालिकेने २५ कोटी रुपये व पिंपरी-चिंचवड महापालिकेने २० कोटी ८७ लाख रुपये जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांना दिले आहेत. या निधीतून ९७९ प्रकल्पग्रस्तांपैकी ३२३ प्रकल्पग्रस्तांना ४५ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. अद्याप ही ५५६ प्रकल्पग्रस्त मदतीच्या प्रतिक्षेत असून, दोन्ही महापालिकेकडून शिल्लक राहिलेली रक्कम जमा केल्यानंतर त्वरीत वाटप करण्यात येईल, असे वाघमारे यांनी स्पष्ट केले. यामुळे गुरुवार (दि.३०) रोजी महापालिकेच्या आयुक्त कार्यालयामध्ये होणाऱ्या बैठकीत शिल्लक निधी लवकरात लवकर मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वाघमारे यांनी सागंतिले.
--
- निधीचे वाटपासाठी पात्र लाभार्थी : ९७९
- आता पर्यंत पैसे वाटप झालेले लाभार्थी : ३२३
- एकूण पैसे वाटप : ४५ कोटी
- शिल्लक लाभार्थी  : ५५६

Web Title: 45crore allotted to the project victims of Bhama Askhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.