देहविक्री करणाऱ्या महिलांच्या अनुदानापैकी ४६ लाख रोकड जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:10 AM2021-05-18T04:10:56+5:302021-05-18T04:10:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : धुणी-भांडी करणाऱ्या महिलांना देहविक्री करणाऱ्या महिला दाखवून तब्बल २ कोटी २० लाख रुपयांच्या निधीचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : धुणी-भांडी करणाऱ्या महिलांना देहविक्री करणाऱ्या महिला दाखवून तब्बल २ कोटी २० लाख रुपयांच्या निधीचा अपहार प्रकरणातील आरोपींकडून पोलिसांनी ४६ लाख ६१ हजार रुपये जप्त केले आहेत. तसेच, कायाकल्प संस्थेच्या कार्यालयातील हार्डडिस्क हस्तगत करण्यात आली आहे. देहविक्री करणाऱ्या महिलांच्या अनुदानाच्या याद्यांना अंतिम स्वरुप देणाऱ्या अधिकाऱ्यांकडे तपास करण्यात येणार आहे.
या प्रकरणात दत्तवाडी पोलिसांनी गौरी गुरुंग, सविता लष्करे, सारिका लष्करे, अमोल माळी, महेश घडसिंग या पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले होते. पोलिसांनी अमोल माळी याच्या घरातून १६ लाख ४२ हजार रुपये आणि महेश घडसिंग याच्या घरातून ३० लाख १९ हजार रुपये जप्त केले आहे. कायाकल्प संस्थेच्या कार्यालयातून २ हार्डडिस्क, लॅपटॉप, पेनड्राईव्ह, महिलांची संमतिपत्रे, बँक पासबुक व इतर कागदपत्रे जप्त केली आहेत.
याबाबत सरकारी वकील किरण बेंडभर यांनी न्यायालयात सांगितले की, अमोल माळी व महेश घडसिंग यांनी संस्थेच्या सदस्यांना महिलांकडून १० हजार रुपये परत घेऊन ते स्वत:कडे ठेवले होते. शासनाकडून लाभार्थींना एकूण ११ कोटी अनुदान मिळाले आहे. रेड लाईट एरियामध्ये देहविक्री करणाऱ्या महिलांव्यतिरिक्त इतर समाजामधील महिलांचा समावेश करुन त्यांना अनुदान देऊन त्यांच्याकडून प्रत्येकी १० हजार रुपये परत घेतले असण्याची शक्यता आहे.
गुन्ह्यांमध्ये अटक केलेल्या आरोपींव्यतिरिक्त याद्यांना अंतिम स्वरुप देण्याचे अधिकार असणारे अधिकाऱ्यांकडे तपास करुन या गुन्ह्यातील अपहार केलेली रक्कम हस्तगत करायची आहे. किती महिलांना अनुदान दिले आहे, याची यादी व नक्की किती शासकीय अनुदानाचा गैरवापर झाला आहे. याचा तपास संबंधित सर्व शासकीय यंत्रणांकडे करायचा आहे. कायाकल्प संस्थेमधून जप्त करण्यात आलेल्या हार्डडिस्कचे वैज्ञानिक विश्लेषण बाकी आहे. विश्लेषणात प्राप्त माहितीबाबत आरोपींना माहिती असण्याची शक्यता असल्याने तपासासाठी आरोपींची गरज आहे.
शासकीय अनुदानातील अपहार झालेली रक्कम ही जप्त केलेल्या ४६ लाख ६१ हजार ७०० रुपयांपेक्षा खूप जास्त आहे. अपहार केलेल्या निधीतील रक्कम हस्तगत करायची असल्याने आरोपींना १० दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात यावी, अशी सरकारी वकील किरण बेंडभर यांनी मागणी केली. न्यायालयाने २१ मेपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
या सर्व प्रकरणातील प्रमुख सूत्रधार आणि जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभागातील जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद सोनवणे हा अद्याप फरार आहे़ पोलीस निरीक्षक विजय खोमणे अधिक तपास करीत आहेत़
महिला व बालकल्याणकडून अद्याप माहिती नाही
या अपहार प्रकरणाबाबत पोलिसांनी महिला व बालकल्याण कक्ष आयुक्त यांच्याकडून माहिती मागविण्यात आली आहे. त्याबाबत माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. ही माहिती व कायाकल्प संस्थेकडून भरण्यात आलेल्या माहितीची पडताळणी बाकी आहे, असे न्यायालयात सांगण्यात आले.