Pune | पुण्यातील कांदा व्यापाऱ्याला ४६ लाखांचा गंडा; कर्नाटकातील दोघांविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 10:06 AM2023-03-22T10:06:28+5:302023-03-22T10:07:20+5:30
नऱ्हे येथील एका ३१ वर्षाच्या व्यावसायिकाने फिर्याद दिली...
पुणे : श्रीलंका व इतर देशात कांदा निर्यात करतो,असे सांगून कर्नाटकातील दोघा व्यापाऱ्यांनी पुण्यातील कांदा व्यापाऱ्याची तब्बल ४६ लाख ३३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत नऱ्हे येथील एका ३१ वर्षाच्या व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिसांनी सिद्धाप्पा ए. एल. एस. भंडारी आणि गजेंद्र सिद्धप्पा (दोघे रा. आर्सिकरी, जि. हसन, कर्नाटक) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मार्च २०२१ पासून आतापर्यंतच्या कालावधीत घडली आहे.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी यांचा मार्केट यार्डात कांदा, बटाटा विक्रीचा गाळा आहे. व्यवसायानिमित्त त्यांची आरोपींशी ओळख झाली. आपला आर्सिकरी येथे मार्केट यार्डात गाळा असून, आपण कांदा निर्यात करतो, असे सांगून विश्वास संपादन केला. त्यांच्याकडून वेळोवेळी १ कोटी ६५ लाख रुपयांचा कांदा घेतला. तो श्रीलंकेला निर्यात करीत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यातील त्याने वेळोवेळी काही पैसे दिले. मात्र, ४६ लाख ३३ हजार रुपये परत न करता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. तेव्हा त्यांनी आर्सिकरी येथे जाऊन माहिती घेतल्यावर ते कांदा निर्यात करत नसून, स्थानिक बाजारपेठेतच विक्री करीत असल्याचे समजले. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या व्यापाऱ्याने फिर्याद दिली असून, सहायक पोलिस निरीक्षक रसाळ तपास करीत आहेत.