४६ टक्के कचरावेचक महिलांचे आरोग्य चिंताजनक : अभ्यासातून धक्कादायक बाबी उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 07:50 PM2018-05-25T19:50:32+5:302018-05-25T19:50:32+5:30
शहरात राहूनही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून लांब असलेल्या पुणे शहरातील कचरा व्यावसायिक महिलांचा अभ्यास व सर्वेक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व स्वच्छह आणि कागद-काच-पत्रा -कष्टकरी पंचायत संस्थेमार्फत करण्यात आला.यात धक्कादायक बाबी उघड झाल्याअसून तब्बल ४६ टक्के कचरावेचक महिलांचे आरोग्य चिंताजनक असल्याचे समोर आले आहे.
पुणे : शहरात राहूनही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून लांब असलेल्या पुणे शहरातील कचरा व्यावसायिक महिलांचा अभ्यास व सर्वेक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व स्वच्छह आणि कागद-काच-पत्रा -कष्टकरी पंचायत संस्थेमार्फत करण्यात आला.यात धक्कादायक बाबी उघड झाल्याअसून तब्बल ४६ टक्के कचरावेचक महिलांचे आरोग्य चिंताजनक असल्याचे समोर आले आहे.
या अभ्यासात अनेक बाबी सामोर आल्या आहेत. त्यात फक्त १५ टक्के कचरावेचक महिलांचे आरोग्य सुस्थितीत असल्याचे निदर्शनास आले आहे. ३९टक्के महिलांचे आरोग्य सर्वसाधारण तर ४६टक्के महिलांचे आरोग्य चिंताजनक असल्याचे दिसून आले आहे.यातील ७० टक्के महिलाना मोठ्या प्रमाणात सांधेदुखी आणि अंगदुखीचा त्रास आहे. ५१टक्के महिलांचे डोळे कमजोर झाले आहेत.वर्गीकृत कचऱ्याचे वर्गीकरण करताना ५५ टक्के महिलाना काहींना काही गोष्टींमुळे कापले किंवा खरचटले आहे. त्यामध्ये सर्वाधिक काच,सुया आणि टोकदार वस्तूंचा समावेश आहे. या महिलांना सकाळी सहा वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत काम करावे लागते. धूळ, कचरा आणि घाणीशी सामना करणाऱ्या या महिलांना साधे पाणीही द्यायला कोणी तयार होत नाही असे अनुभव स्वच्छ संस्थेशी निगडित महिलांनी सांगितले.महिलांसाठी पुरेशी आणि स्वच्छ सच्छतागृह उपलब्ध नसल्याने त्यांच्या आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. या महिलांनी सर्वेक्षणाच्या मुलाखतीत स्वच्छता साधनांविषयी नाराजी व्यक्त केलीय आहे. विशेषतः बूट व हातमोज्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. इतकेच नव्हे तर पायाची बोटे आणि टाचा उघड्या राहतील असे सॅंडल दिले जातात अशी तक्रारही त्यांनी नोंदवली आहे. यातील सुमारे ५८टक्के महिलांना जनआरोग्य विमा योजनेपासून दूर आहेत.
कचरा वेचणाऱ्या महिलांच्या आरोग्याचे प्रश्न गंभीर होत आहेत. त्यांना स्वच्छतागृहे वापरू न देणे, आरोग्याबाबत पुरेशा सुविधा नसल्याने आरोग्य धोक्यात येत असल्याची माही या संशोधन प्रकल्पाच्या प्रमुख व समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख प्राध्यापक श्रुती तांबे यांनी दिली. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आयुष्यभर अपार कष्ट घेणाऱ्या महिलांकडे समाज अतिशय तुच्छतेने बघत असून त्यांचे जीवन, आरोग्य आणि कामाच्या स्वरूपाबाबत कोणीही आस्थेने विचार करत नसल्याचे निदर्शनास आल्याचेही त्यांनी म्हटले.