४६ पोेलिसांच्या खांद्यावर पसारा

By admin | Published: November 20, 2014 04:30 AM2014-11-20T04:30:11+5:302014-11-20T04:30:11+5:30

नागरीकरण वेगाने होत आहे. त्याच्या तुलनेत कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचे संख्याबळ कमी पडत आहे.

46 poles shoulder rolls | ४६ पोेलिसांच्या खांद्यावर पसारा

४६ पोेलिसांच्या खांद्यावर पसारा

Next

महेंद्र कांबळे, बारामती
नागरीकरण वेगाने होत आहे. त्याच्या तुलनेत कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचे संख्याबळ कमी पडत आहे. उपलब्ध पोलीस बळावर सर्व सोपस्कार पार पाडावे लागत आहेत. बारामतीच्या काही उपनगरांसह ३७ गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या बारामती ग्रामीण पोलीस ठाण्याला अधिकारी, कर्मचारी मिळून फक्त ४६ जणांचे संख्याबळ आहे. त्यातील ५ जणांची प्रतिनियुक्तीवर इतर ठिकाणी नेमणूक केली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात ४१ जणांच्या बळावरच दररोजचे दिव्य पार पाडावे लागते. या पोलीस ठाण्याला किमान ५० ते ५५ पोलीस कर्मचारी आणि ५ ते ६ पोलीस अधिकाऱ्यांची गरज आहे.
सुरुवातीला भाडेतत्त्वावर पंचायत समितीलगत बारामती पोलीस ठाणे कार्यरत होते. तेथून बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील एका गोडावूनमध्ये या पोलीस ठाण्याचे स्थलांतर करण्यात आले. तेथे अनेक अडचणी येऊ लागल्याने बारामती एमआयडीसीत पोलीस ठाण्याची उभारणी करण्यात आली. या पोलीस ठाण्याच्या वरच्या मजल्यावर अतिरिक्त पोलीस अधीक्षकांचे कार्यालय आहे. सध्या बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात १ पोलीस निरीक्षक, २ सहायक पोलीस निरीक्षक, २ पोलीस उपनिरीक्षक, ५ पोलीस फौजदार, ९ पोलीस हवालदार, ५ महिला पोलीस कर्मचाऱ्यांपैकी एका कर्मचाऱ्याची प्रतिनियुक्तीवर नेमणूक करण्यात आली आहे. ३७ गावांचे आणि वाड्यावस्त्यांच्या गस्तीसाठी १ जीप, २ दुचाकी गाड्या दिमतीला आहेत. याच पोलीस ठाण्यांतर्गत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार, अजित पवार यांचे बंगले आहेत.
विद्या प्रतिष्ठान, शारदानगर शैक्षणिक संकुल, शिव विद्या प्रसारक मंडळाचे शैक्षणिक संकुल कार्यरत आहे. किमान १५ ते २० हजार विद्यार्थी या तीनही शैक्षणिक संकुलात शिक्षणासाठी येतात.
माळेगाव साखर कारखाना, विमानतळ, बारामती एमआयडीसी आहे. विमानतळावर येणारे राजकीय नेते, उच्च पदस्थांच्या बंदोबस्ताचा भार याच पोलीस ठाण्यावर आहे. त्यातील १ सहायक पोलीस निरीक्षक, ४ कर्मचारी माळेगाव दूरक्षेत्रासाठी नियुक्तीला आहेत. माळेगाव आणि कारखान्याच्या परिसरातच ४० ते ५० हजार लोकसंख्या आहे. त्यामुळे वाढलेल्या नागरीवस्त्यांमधील ताणतणावाला तोंड देत काम करावे लागते. उपलब्ध संख्याबळातून रजा, दीर्घ रजा, सुट्यांवर असलेल्या कर्मचाऱ्यांचा ताळमेळ राखावा लागतो. त्यामुळे आणखी किमान ५० ते ५५ पुरुष-महिला कर्मचारी, ३ ते ४ सहायक पोलीस निरीक्षक, २ पोलीस उपनिरीक्षकांची गरज या पोलीस ठाण्याला आहे. या पोलीस ठाण्याची इमारत देखणी आहे. आवश्यक असलेल्या सर्व सुविधा या पोलीस ठाण्यात दिल्या आहेत.

Web Title: 46 poles shoulder rolls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.