शाशासकीय मेडिकल कॉलेजच्या ४६० जागा वाढल्या, २६ जूनपर्यत आॅनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची मुदत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 05:36 AM2019-06-25T05:36:08+5:302019-06-25T05:38:18+5:30
मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रासह सर्व राज्यांतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (एमबीबीएस) जागा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
- राहुल शिंदे
पुणे : मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रासह सर्व राज्यांतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (एमबीबीएस) जागा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ४६० जागा वाढल्या आहेत.
राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या २ हजार ७६० जागा वाढून ३ हजार ७३० झाल्या. त्यात राज्यातील २० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या ४६० जागा वाढल्या आहेत. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून विद्यार्थ्यांना २६ जूनपर्यंत आॅनलाईन अर्ज भरण्यास मुदत देण्यात आली आहे. आॅनलाईन अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी २६ जून रोजी रात्री १० वा. जाहीर करण्यात येईल. २९ जून ते ४ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम देता येतील. वैद्यकीय प्रवेशाची प्राथमिक गुणवत्ता यादी ४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता प्रसिद्ध होईल. त्यानंतर प्रवेश फेऱ्यांच्या माध्यमातून पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील.