शहरात पाणीपट्टीची ४६८ कोटींची थकबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 08:54 PM2018-08-20T20:54:56+5:302018-08-20T21:04:13+5:30
शहरामध्ये आठ लाखांपेक्षा नोंदणीकृत प्रॉपर्टीधारक असताना केवळ १ लाख ६० हजार कुटुंबांकडे अधिकृत नळ जोडणी आहे.
पुणे: शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेले उत्पन्न, उत्पन्नाचे स्त्रोत मात्र दिवसेंदिवस कमी होत आहेत, असे असताना शहरामध्ये पाणीपट्टीची थकबाकी तब्बल ४६८ कोटींच्या घरात गेली असल्याची माहिती समोर आली आहे. तर शहरात सध्या केवळ १ लाख ६० हजार अधिकृत नळ कनेक्शन असून अनधिकृत नळ कनेक्शनची संख्या दुप्पट म्हणजे तब्बल साडे तीन लाखांच्या घरात असल्याची माहिती अधिकृत सुत्रांनी दिली.
शहरामध्ये आठ लाखांपेक्षा नोंदणीकृत प्रॉपर्टीधारक असताना केवळ १ लाख ६० हजार कुटुंबांकडे अधिकृत नळ जोडणी आहे. याबाबत नगरसेवक विशाल तांबे यांनी शहरातील पाणी पुरवठ्याची सद्य:स्थिती, एकूण थकबाकी व अधिकृत नळ जोडणी संख्या याबाबत विचारलेल्या लेखी प्रश्नाला उत्तर देताना महापालिकेच्या वतीने वरील माहिती देण्यात आली. यामध्ये सध्या शहरामध्ये घरगुती वापराचे सुमारे १ लाख २२ हजार अधिकृत नळ कनेक्शनच आहेत. तर व्यावसायिक, औद्यागिक वापराचे सुमारे ३८ हजार नळ कनेक्शन आहेत. यातमध्ये घरगुती वापर करत असलेल्या कुटुंबाकडे सुमारे १३७.५७ कोटी रुपयांची तर औद्यागिक व व्यावसायिक वापर करत असलेल्याकडे तब्बल ३३०.१५ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे प्रशासनाने लेखी दिले आहे.
याबाबत पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख व्ही.जी.कुलकर्णी यांनी सांगितले की, शहरातील नागरिकांकडून पाणीपट्टी वसूल करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.थकबाकीदारांमध्ये दुबार पाणीपट्टी, नादुरुस्त मीटर, रस्ते दुरुस्ती, रुंदीकरमध्ये बंद पडलेली नळ कनेक्शन असे अनेक प्रकार आहेत. त्यामुळे थकबाकीदारांची संख्या देखील वाढली आहे. पाणीपट्टी वसुलीसाठी अनेक वेळा लोक अदालत भरविण्यात आली, परंतु याला देखील खूप कमी प्रतिसाद मिळत आहे. यामुळे थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.