Pune Crime | पुण्यात भरदिवसा कोयत्याचा धाक दाखवून ४७ लाख लुटले; नाना पेठेतील घटना
By विवेक भुसे | Published: March 23, 2023 08:29 PM2023-03-23T20:29:18+5:302023-03-23T20:30:56+5:30
चोरट्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवून ही लुट केल्याचे दिसून येत आहे...
पुणे : दुकानात जमा झालेली रोख रक्कम बँकेत भरण्यासाठी घेऊन जाणार्या कर्मचार्या रस्त्यात अडवून कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील ४७ लाख २६ हजार रुपयांची बॅग दोघा चोरट्याने पळून नेली. नाना पेठेतील आझाद आळी येथे गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडला. दुकान ते बँक हे अवघे एक ते दोन किलोमीटर अंतर असताना हा प्रकार घडला आहे. चोरट्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवून ही लुट केल्याचे दिसून येत आहे.
याबाबत मंगलपुरी भिकमपूरी गोस्वामी (वय ५५, रा. मंगळवार पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गोस्वामी हे नाना पेठेतील पिंपरी चौकाजवळील पन्ना एजन्सीमध्ये ४० वर्षांपासून कामाला आहेत. विविध कंपन्यांचे सिगारेट व बडीशेपचे ते वितरक आहेत. दुकानात जमा झालेली रोख रक्कम हे दररोज बँकेत भरतात. गुढी पाडव्यामुळे बुधवारी बँकेला सुट्टी असल्याने दुकानात दोन दिवसांची रोकड जमा झाली होती.
गोस्वामी हे गुरुवारी सकाळी ९ वाजता नेहमीप्रमाणे दुकानात आले. त्यांनी जमा झालेली ४७ लाख २६ हजार रुपयांची रोकडे मोजून एका बँगेत ठेवली. त्याबराेबर १० धनादेश घेऊन ते सकाळी साडेअकरा वाजता दुचाकीवरुन बँकेत निघाले. पैशांची बॅग त्यांनी पायाजवळ ठेवली होती. गाडीवरुन जात असताना आझादआळी येथे पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. परंतु, त्यांनी स्वत:चा तोल सावरला. तेव्हा धक्का देणार्याने त्याची गाडी आडवी घातली. मागे बसलेल्याने आली उतरुन गाडी नीट चालवता येत नाही का असे विचारले. त्यावर गोस्वामी यांनी मी गाडी सरळ चालवत आहे. तुम्हीच मला मागून येऊन धक्का दिला आहे, असे म्हणाले.
त्यावरुन त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यांच्यातील एकाने गोस्वामी यांच्या डोक्याच्या मागच्या बाजूला हाताने फटका मारला. दोघांनी पैशांची बॅग ओढली. तेव्हा त्यांनी ती घट्ट धरली. यावेळी झटापट सुरु झाल्याने रस्त्यावरील काही लोक तेथे आले. तेव्हा मागे बसलेल्याने कमरेला लावलेला कोयता काढून त्यांच्यावर उगारला. दोघेही त्यांना मारहाण करुन लागले. गोस्वामी खाली पडल्यावर चोर चोर असे ओरडू लागले. तेव्हा त्यांनी त्यांच्या हातातील बॅग जबरदस्तीने ओढून घेऊन ते दुचाकीवरुन इंडियन बँकेकडील रोडने पळून गेले. यावेळी जमलेल्या लोकांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु ते पळून गेले. लोकांनीच पोलिसांना याची खबर दिली.
भर दिवसा लुटमारीचा प्रकार घडल्याची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सतीश गाेवेकर आदि अधिकार्यांनी भेट देऊन तपासाच्या दृष्टीने सूचना केल्या.
फिर्यादी हे नेहमी त्याच वेळेला व त्याच रोडने दररोज जातात. एकटेच असतात. हे लक्षात घेऊन पाळत ठेवून ही लुट केल्याचे दिसून येत आहे. चोरट्यांनी ओळख लपविण्यासाठी तोंडाला मास्क लावला होता. सीसीटीव्हीच्या सहाय्याने त्यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी पोलिसांची पथके तयार केली आहेत.
राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त
पाळत ठेवून लुटले
- दुकानापासून पाठलाग करुन संधी मिळताच दिली धडक
- गुढी पाडव्याची सुट्टीमुळे मोठी कॅश मिळण्याची शक्यता घेऊन केले कृत्य
- दोघांपेक्षा अधिक जण सहभागी असण्याची शक्यता
रोकड घेऊन जाताना घ्या काळजी
- दुकानात जमा होणारी रोकड घेऊन जाताना पुरेशी काळजी घेतली नसल्याचे या प्रकरणात दिसून येत आहे.
- दुकान ते बँक हे अंतर कमी असेल तरी इतकी मोठी रक्कम घेऊन जाताना बरोबर कोणाला तरी घेऊन जावे.
- अशी रक्कम घेऊन जाताना रोड व वेळा नेहमी बदलत्या ठेवाव्यात
- दुचाकीवरुन एकट्याने जाण्याऐवजी नेहमी बरोबर कोणाला तरी न्यावे
- अशा रक्कमा नेताना कारचा वापर करावा, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.