जिल्ह्यात ४७ हजार ६३६ व्यक्तींना सहव्याधी; तातडीने घ्यावा लागणार उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:08 AM2021-06-03T04:08:25+5:302021-06-03T04:08:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यातील कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात राबवलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यातील कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात राबवलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन लोकांची तपासणी करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात दोन फेऱ्या पूर्ण झाल्या असून, सध्या तिसऱ्या फेरीचे सर्वेक्षण सुरू आहे. यात सध्या जिल्ह्यात ४७ हजार ६३६ लोक मधुमेह, हृदयविकार, किडनी, लठ्ठपणा यांसारख्या सहव्याधी असणारे आहेत. कोरोनाची दुसरी लाट व येणाऱ्या तिसऱ्या लाटेमध्ये अधिक लक्ष द्यावे लागणार आहे.
पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात ४६ लाख ९५ हजार ३५ लोकसंख्या असून, घरांची संख्या ९ लाख २३ हजार ४११ च्या घरात आहे. यापैकी आतापर्यंत ४६ लाख ५८ हजार ३७६ नागरिकांची घरी जाऊन तपासणी करण्यात आली.
या तपासणीसाठी शिक्षक, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यांचा समावेश असलेले तब्बल २ हजार ३३० पथके आहेत. यामध्ये संशयित कोरोनाचे रुग्ण शोधणे, जनतेला आरोग्य शिक्षण देणे आणि मधुमेह, हृदयविकार, किडनी, लठ्ठपणा यांसारख्या सहव्याधी असणाऱ्या व्यक्तींना शोधणे, जर ते उपचार घेत नसतील तर त्यांच्यावर उपचार करणे हा मुख्य उद्देश आहे.
------
- ग्रामीण भागातील एकूण लोकसंख्या : ४६९५०३५
- सर्वेक्षण झालेली लोकसंख्या : ४६५८३७६
- सर्वेक्षणासाठीची पथके : २३३०
- पथकातील कर्मचारी : ६९९०
-----------
सहव्याधी असलेल्या व्यक्ती
तालुका सहव्याधी नागरिक
आंबेगाव १२९३३
बारामती ०२
भोर ११३
दौंड २४४
हवेली ८५३
इंदापूर ००
जुन्नर १३२९४
खेड ३६६७
मावळ ३४३३
मुळशी ३०३३
पुरंदर ९०८४
शिरूर ८०
वेल्हा ००
------
जिल्ह्यात ग्रामीण भागात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अंतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सारीचे लक्षणे असलेली २ हजार ७०४ लोक आढळून आली, तर कोविडची लक्षणे असलेले २ हजार ७७८ एवढे लोक आढळून आले.
------
प्रत्येक घरात सर्वेक्षणासाठी गेल्यानंतर दरवाजावर स्टिकर लावण्यात येतो, तसेच प्रत्येक सदस्यांची नोंद अॅपमध्ये केली जाते. इन्फारेड थर्मामीटरने तापमान तसेच पल्स ऑक्सिमीटरने शरीरातील ऑक्सिजनची पातळी मोजून याची नोंद ॲपमध्ये घेतली जाते. ताप असलेली व्यक्ती आढळ्यास अशा व्यक्तीस खोकला, घशात दुखणे, थकवा आदी लक्षणे असल्यास तातडीने फिवर क्लिनिकमध्ये पाठविले जाते.
--------
ग्रामीण भागात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत सर्वेक्षण करताना हाॅटस्पाॅट गावांतील कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आले. तसेच स्थानिक प्रशासनाकडे सहव्याधी असलेल्या लोकांची माहिती उपलब्ध असल्याने त्वरित उपचार उपलब्ध करून देण्यास मदत झाली. यामुळे मृत्यूदर कमी करण्यास मदत झाली.
- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी
------