जिल्ह्यात कोरोनाकाळात ४७ हजार ८५७ मे. टन मोफत अन्नधान्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:09 AM2021-06-24T04:09:11+5:302021-06-24T04:09:11+5:30
- बायोमेट्रिक धान्य वाटपही जोरात सुरू लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केंद्र शासनाने गरीब व सर्वसामान्य ...
- बायोमेट्रिक धान्य वाटपही जोरात सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केंद्र शासनाने गरीब व सर्वसामान्य कुटुंबाला मोफत धान्य वाटप करण्याची घोषणा केली. हे मोफत धान्य वाटप करताना बायोमेट्रिक बंधनकारक करून देखील पुणे जिल्ह्यात दीड महिन्यात ४७ हजार ८५७.२६ मे टन मोफत अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
केंद्र शासनाने मे व जून २०२१ करिता राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्याव्यतिरिक्त प्रतिसदस्य प्रतिमाह ५ किलो अन्नधान्य मोफत वितरीत करण्यात येत आहेत. अन्नधान्य वेळेत वितरण करण्यासाठी पुणे शहर व ग्रामीणकरिता नियोजन करण्यात येऊन राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या दोन्ही योजनाचे धान्य वेळेत अन्न महामंडळाच्या गोदामातून घेऊन दोन्ही योजनांचे धान्य प्रत्यक्षात वाटप करणेसाठी स्वस्त धान्य दुकानात पोहोच करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सर्व तहसीलदारांना सूचना देऊन प्रत्यक्ष लाभार्थ्यांना तत्काळ वाटप करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. सर्व तहसीलदार व परिमंडळ अधिकारी यांनी रास्तभाव दुकानदारांच्या बैठका घेऊन लॉकडाऊन कालावधीमध्ये सर्व पात्र लाभार्थ्यांना धान्य वितरणाबाबत शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून अन्नधान्य वितरण सुरू आहे.
-------
एकूण रेशनकार्डधारक - ८६००३९
प्राधान्य क्रम - ५२३२९२
अंत्योदय - ४८४५५
केसरी - २८८२९२
--------
मे महिन्याचे धान्य मिळाले
शासनाने लाॅकडाऊनमुळे उद्योगधंदा बंद असलेल्या लोकांची उपासमार होऊ नये यासाठी मोफत धान्य पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मे महिन्यात २५ किलो गहू व तांदूळ रेशन कार्डवर उपलब्ध झाले आहे. शासनाने मोफत धान्य वाटप केल्याने चांगली मदत झाली आहे.
- एक लाभार्थी , खेड
-----
जिल्ह्यात मोफत धान्य वाटप सुरळीत सुरू
पुणे जिल्ह्यात केंद्र शासनाने निश्चित केल्यानुसार मोफत धान्य वाटप सुरू आहे. मे महिन्यात शंभर टक्के वाटप झाले असून, जून महिन्याचे वाटप सुरू आहे. आतापर्यंत जून महिन्याचे वाटप देखील पन्नास टक्क्यांच्या पुढे गेले आहे. बायोमेट्रिक सिस्टिमद्वारे हे वाटप करण्यात येत असून, कुठेही अडचण येत नाही.
- उत्तम पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी.
---------
धान्य घेतल्यानंतरच अंगठा लावा
शासनाने मोफत धान्य वाटप करताना होणारा काळाबाजार व बोगसगिरी रोखण्यासाठी धान्य वाटप करताना संबंधित कुटुंब प्रमुखाचे बायोमेट्रिक करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यात बायोमेट्रिकद्वारेच धान्य वाटप होत आहे. कार्डधारकांनी धान्य घेतल्यानंतरच अंगठा लावावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील यांनी केले.