देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी! ४७ वर्षीय महिलेने चार जणांच्या आयुष्याला दिली संजीवनी
By दीपक अविनाश कुलकर्णी | Published: January 6, 2021 10:09 PM2021-01-06T22:09:06+5:302021-01-06T22:17:31+5:30
मागील वर्षी पुण्याने अवयवदानामध्ये पहिला क्रमांक मिळविला होता..
पुणे : देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी! ही उक्ती तंतोतत लागू व्हावी अशी एक घटना पुण्यात घडली आहे. एका ब्रेन डेड झालेल्या सत्तेचाळीस वर्षीय पुण्यातील महिलेच्या कुटुंबाने घेतलेल्या एका महत्वपूर्ण व कौतुकास्पद निर्णयाने चार जणांना पुन्हा जीवदान मिळाले. आणि घटनेबाबत विशेष बाब म्हणजे राज्यातील हे पहिले अवयवदान असून तर देशातील दुसरे आहे. मागील वर्षी पुण्याने अवयवदानामध्ये पहिला क्रमांक मिळविला होता.एकूण ४१ मृत व्यक्तींनी आपले अवयव दान करत समाजामध्ये आदर्श पायंडा पाडला होता.
मिळालेल्या माहितीनुसार , एका पुणेकर महिलेचा रविवारी ( दि.३) जहांगीर रुग्णालयात मृत्यू झाला होता. यानंतर महिलेच्या कुटुंबीयांनी या दुःखद प्रसंगी सुद्धा धीरोदात्तपणा व माणसुकीचे दर्शन घडविताना अवयव प्रत्यारोपणाचा निर्णय घेतला. त्यांच्या संमतीने सोमवारी अवयव प्रत्यारोपणासंबंधीच्या संपूर्ण प्रकियेची पूर्तता करण्यात आली. व त्यानंतर संबंधित ब्रेन डेड झालेल्या महिलेचे हृदय आणि फुफ्फुस विमानाने हैदराबादला ३० वर्षीय रुग्णासाठी पाठवण्यात आले. तिथे केआयएमएस रुग्णालयात तरुणाची अवयव प्रत्यारोपण शस्रक्रिया पार पडली. तसेच पुण्याच्या कर्वेरोडवरील सह्याद्री रुग्णालयात ३३ वर्षीय रुग्णाला यकृत देण्यात आले. त्याचप्रमाणे शहरातील ५३ वर्षीय व्यक्तीला व नाशिकमधील महिलेला मिळालेल्या किडनीने जीवदान लाभले अशी माहिती जहांगीर रुग्णालयाच्या अवयव प्रत्यारोपण विभागाच्या समन्वयक म्हणून कार्यरत असणाऱ्या वृंदा पुसाळकर यांनी दिली आहे.
कोरोना संकटाच्या वेळी अवयव प्रत्यारोपणाची साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली होती. त्यामुळे एकीकडे अवयवदानाची मागणी वाढत असताना दात्यांची कमतरता भासत होती.काही कुटुंबीयांना इच्छा असून देखील कोरोना काळात अवयव दान करता आले नाही. मात्र आता या घटनेने अवयवदानाच्या मोहिमेला चालना देणारी असून या वर्षात ती अधिक व्यापक होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. अवयवदानामुळे अनेकांच्या आयुष्याला संजीवनी मिळणार आहे. डॉ. शीतल महाजनी, सचिव, पुणे झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन कमिटी.
समुपदेशानंतर घेतला स्तुत्य निर्णय..
एका ४७ वर्षांच्या महिलेला मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने जहांगीर रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्या 'ब्रेनडेड' झाल्याचे घोषित केले. सरकारी नोकरीत असलेल्या या महिलेच्या पतीने समुपदेशानंतर अवयव प्रत्यारोपणाचा स्तुत्य निर्णय घेतला.