नळजोड न देताच आले ४८ हजार रुपयांचे बिल
By Admin | Published: February 16, 2015 04:39 AM2015-02-16T04:39:34+5:302015-02-16T04:39:34+5:30
कोथरूड येथील रामबाग कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका नागरिकाला नळजोड न देताच पालिका प्रशासनाने पाणीपट्टीचे ४८ हजार रुपयांचे बिल पाठविले आहे.
पुणे : कोथरूड येथील रामबाग कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका नागरिकाला नळजोड न देताच पालिका प्रशासनाने पाणीपट्टीचे ४८ हजार रुपयांचे बिल पाठविले आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या ही बाब निर्दशनास आणून देऊनही प्रशासनाने त्यांची दखल घेतलेली नाही.
आॅर्चिड सोसायटीत राहणारे दीनदयाळ वर्मा यांच्या पाण्याचे कनेक्शन सोसायटीने सोडले. त्यामुळे त्यांनी महापालिकेकडे स्वतंत्र नळजोड कनेक्शनसाठी २६ मार्च २०१३ रोजी अर्ज केला. त्यानंतर पालिकेकडे रीतसर २ हजार ८३० रुपये अनामत रक्कम भरली. त्यांना नळजोड मंजूर झाल्यानंतर ते बसविण्याकरिता आवश्यक असलेले ८ ते १० हजार रुपयांचे साहित्य खरेदी केले.
महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी त्यांना नळजोड कनेक्शन देण्यासाठी सोसायटीमध्ये आले असता त्यांना स्वतंत्र नळजोड देण्यास सोसायटीचे पदाधिकारी व रहिवाशांनी विरोध केला. त्यामुळे वर्मा यांच्या घरी नळजोड न बसविताच पालिकेचे कर्मचारी परत गेले. सोसायटीच्या संमतीशिवाय वर्मा यांना नळजोड देता येणार नसल्याचे वर्मा यांना सांगण्यात आले. त्यामुळे नळजोड कनेक्शनसाठी भरलेली अनामत रक्कम परत मिळावी, म्हणून वर्मा यांनी मागणी केली. मात्र, त्यांना पालिकेकडून अनामत रक्कम देण्यात आली नाही.
दीड वर्षांनी ६ फेब्रुवारी २०१५ रोजी महापालिकेकडून ४८ हजार रुपयांचे पाणीवापराचे बिल पाठविले. महापालिकेकडून बिल पाठविण्यात आल्याने त्यांना धक्का बसला. त्यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्याकडे याबाबत तक्रार केली. मात्र, पहिल्यांदा बिल भरा मग पाहू, अशी उत्तरे त्यांना देण्यात आल्याचे वर्मा यांनी सांगितले.