भीमाशंकर अभयारण्यात दिसले ४८२ शेकरू, १६,३४३ घरटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:08 AM2021-06-17T04:08:29+5:302021-06-17T04:08:29+5:30

भीमाशंकर: महाराष्ट्र राज्याचे वन्यप्राणी विषयक मानचिन्ह असलेल्या शेकरूंची भीमाशंकर अभयारण्यात गणना केली गेली. संपूर्ण जंगलात १६,३४३ घरटी ...

482 shekars, 16,343 nests were seen in Bhimashankar Sanctuary | भीमाशंकर अभयारण्यात दिसले ४८२ शेकरू, १६,३४३ घरटी

भीमाशंकर अभयारण्यात दिसले ४८२ शेकरू, १६,३४३ घरटी

Next

भीमाशंकर: महाराष्ट्र राज्याचे वन्यप्राणी विषयक मानचिन्ह असलेल्या शेकरूंची भीमाशंकर अभयारण्यात गणना केली गेली. संपूर्ण जंगलात १६,३४३ घरटी व ४८२ शेकरू आढळून आले. प्रत्यक्षात दिसलेले शेकरू व आढळून आलेली घरटी पाहिली असता ही आकडेवारी समाधानकारक असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण यांनी सांगितले.

शेकरूंसाठी भीमाशंकरचे जंगल संरक्षित अभयारण्य म्हणून जाहीर करण्यात आले आहे. हे अभयारण्य ११४ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले असून भीमाशंकर अभयारण्य क्र.१ व २ अशा दोन भागांत विभागले गेले आहे.

शेकरूचे आयुष्य ८ ते ९ वर्षांचे असते. एका शेकरूचे प्रादेशिक क्षेत्र १ ते ५ हेक्टर असू शकते. यामध्ये शेकरू झाडाची पाने, काटक्या यांच्या सहाय्याने घुमटकार आकारची घरटी बनवतो. एक शेकरू ६ ते ८ घरटी बनवते. शेकरू डिसेंबर-जानेवारी महिन्यात मिलन करतात. एक मादी दरवर्षी प्रजनन करेलच असे नाही. त्यामुळे शेकरूंची संख्या झपाट्याने वाढत नाही. शेकरू वर्षातून एकवेळा एका बछड्याला जन्म देतो. मादी सहा महिने पिल्लाचे संगोपन करते. शेकरू मोठ्या आकाराच्या गर्भ घरट्यात पिल्लांना जन्म देतात. त्यामुळे ही गर्भ घरटी मोठ्या आकाराची असतात. शेकरू सर्वसाधारणपणे झाडावर रहाणारा, प्रामुख्याने फळे खाणारा, फळे नसतील तर बीज, झाडांची फुले, साल खाणारा प्राणी आहे. त्याची सर्प व गरूड शेकरूची शिकार करतात.

भीमाशंकर अभयारण्यातील दोन परिमंडळांतील १२ नियम क्षेत्रात शेकरूंची गणना घरटी मोजूण व प्रत्यक्ष दिसलेल्या शेकरूची नोंद घेऊन गणना केली गेली. घरटी पाहताना वापरलेली, दुरुस्तीची गरज असलेली, सोडून दिलेली व गर्भ घरटी अशा चार प्रकारची घरटी शोधून नोंदी केल्या गेल्या. घरट्यांच्या नोंदी घेताना ठिकाण, झाडाचा प्रकार, शेकरू प्रत्यक्ष दिसल्यास त्याचे ठिकाण याच्या नोंदी अक्षांश-रेखांशासह घेण्यात आल्या.

शेकरू गणना वन्यजीव विभागाचे वनसरंक्षक एस.रमेश कुमार, सहायक वनसंरक्षक दिलीप भुर्के यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण, वनपाल एन.एच.गिऱ्हे, एम.जी.वाघुले यांच्यासह वन्यजीव विभागाच्या वनरक्षकांनी मिळून केले.

भीमाशंकर अभयारण्यातील आहुपे, पिंपरगणे, भट्टी, साखरमाची, साकेरी, पाटण, घाटघर, कोंढवळ, निगडाळे, भोरगिरी, भोमाळे, वेहळोली या क्षेत्रात गणना केली गेली. गणनेदरम्यान मोठ्या आकाराची घरटी जास्त प्रमाणात दिसल्याने शेकरू संगोपनाच्या दृष्टीने अतिशय चांगली बाब समोर आली आहे असल्याचे वसंत चव्हाण यांनी सांगितले.

शेकरू

शेकरूचे घरटे

Web Title: 482 shekars, 16,343 nests were seen in Bhimashankar Sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.