ऑनलाईन फसवणुकीतून ४९ हजारांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 03:52 PM2021-03-24T15:52:21+5:302021-03-24T15:53:25+5:30
चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून केली ऑनलाईन फसवणूक
पिंपरी: चांगल्या नोकरीचे पर्याय देते, असे सांगून महिलेने डेबिट कार्डची माहिती घेतली. त्यानंतर बँकेच्या खात्यातून ४९ हजार रुपये काढून घेतले. पूर्णानगर, चिंचवड येथे १८ मार्च आर्थिक फसवणुकीचा हा प्रकार घडला.
हरिषचंद्र रामचंद्र भालेराव (वय ४०रा चिंचवड) यांनी या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. २३) फिर्याद दिली आहे. शगुन (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही), या महिला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने फिर्यादी यांना फोन केला. चांगल्या नोकरीचे पर्याय देते, असे आरोपी महिलेने फिर्यादीला सांगितले. फिर्यादीचा विश्वास संपादन करून मोबाईलवर लिंक पाठवली. फिर्यादीने त्या लिंक वर जाऊन त्यांची माहिती भरून आरोपी महिलेने सांगितल्याप्रमाणे शंभर रुपये भरण्यासाठी फिर्यादीने त्यांच्या डेबिट कार्डची माहिती लिंकवर दिली. त्यानंतर ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण केली असता फिर्यादी यांच्या बँकेच्या खात्यातून ४९ हजार रुपये काढून घेतल्याचे समोर आले आले.