Pune: पुणे जिल्ह्यातील ZP च्या ४९४ शाळा धोकादायक; शिक्षण विभागाकडून पुन्हा सर्व्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 01:47 PM2023-06-23T13:47:27+5:302023-06-23T13:50:01+5:30
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडून नादुस्त शाळांचा पुन्हा सर्व्हे करण्यात येणार आहे...
पुणे :जिल्हा परिषदेच्या शाळा १५ जूनपासून सुरू झाल्या आहेत. काही ठिकाणी शाळांच्या वर्गखोल्यांची दारे, खिडक्या नाही तर काही ठिकाणी छताचीही दुरवस्था झालेली आहे. अशा शाळांची संख्या ४९४ असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडून नादुस्त शाळांचा पुन्हा सर्व्हे करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमध्ये गरीब तसेच सर्वसामान्यांची मुले शिक्षण घेतात. शाळांची गुणवत्ता सुधारावी. यासाठी शिक्षण विभागातर्फे विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहे. मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यावर भर असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, जिल्ह्यातील तब्बल ४९४ शाळा धोकादायक आहेत. या शाळांच्या इमारती जीर्ण अवस्थेत आहेत. अशा शाळांमध्ये आपली मुले कशी पाठवावीत, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत खास काही शाळा डिजिटल झाल्या असल्या तरी प्राथमिक सुविधांची अनेक ठिकाणी वानवा आहे. काही धोकादायक शाळांमध्ये जीव मुठीत घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. नादुरुस्त शाळा दुरुस्तीसंदर्भात शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व पालकांकडून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांची संख्या तीन हजार ६२६ इतकी आहे. त्यातील ४९४ शाळांची दुरवस्था झालेली आहे. काही ठिकाणी शाळांच्या भिंती पडल्या आहेत तर कुठे संरक्षण भिंत जमीनदोस्त झाली आहे. काही ठिकाणी तर बसायला देखील जागा नाही. अशी एकूण गंभीर परिस्थिती असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिक्षण विभागाकडून पुन्हा एकदा धोकादायक शाळांचा सर्व्हे करण्यात येणार आहे. सध्या ज्या शाळा धोकादायक आहेत. त्यातील काही शाळांची दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
तालुकानिहाय धोकादायक शाळांची संख्या
तालुका शाळा संख्या
आंबेगाव ३०
बारामती १८
भोर ३५
दौंड ५४
हवेली ३३
इंदापूर ६३
जुन्नर ५४
खेड ४५
मावळ ४२
मुळशी २७
पुरंदर ३५
शिरुद ३६
वेल्हा २२
एकूण ४९४