रवींद्र बऱ्हाटेच्या ५ साथीदारांना नंदूरबारहून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:10 AM2021-01-14T04:10:48+5:302021-01-14T04:10:48+5:30

पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याच्या ५ साथीदारांना नंदूरबार येथे जाऊन सापळा रचून अटक केली. विशाल शिवाजी ...

5 accomplices of Ravindra Barhate arrested from Nandurbar | रवींद्र बऱ्हाटेच्या ५ साथीदारांना नंदूरबारहून अटक

रवींद्र बऱ्हाटेच्या ५ साथीदारांना नंदूरबारहून अटक

Next

पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याच्या ५ साथीदारांना नंदूरबार येथे जाऊन सापळा रचून अटक केली.

विशाल शिवाजी ढोरे (वय ३६), अस्लम मंजूर पठाण (वय २४), सचिन गुलाब धिवार (वय ३२), परवेज शब्बीर जमादार (वय ३९), बालाजी विश्वनाथ लाखाडे (वय २७) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना २० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे व इतर १३ आरोपींविरुद्ध गेल्या वर्षी धमकावून जबरदस्तीने जागा बळकाविणे, खंडणी मागणे अशा विविध कलमाखाली हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्या होता. या प्रकरणात १३ जणांवर मोक्कांर्गत कारवाई करण्यात आली. मोक्कांतर्गत कारवाई केल्यानंतर अनेक आरोपी फरार झाले होते. गेली ५ महिने हे आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते. विशेष सत्र न्यायालयाने सर्व आरोपींचे पकड वॉरंटही काढले होते.

याबाबत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी माहिती दिली. यावेळी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्च्नसिंह उपस्थित होते. पोलीस आयुक्तांच्या आदेशान्वये गुन्हे शाखेचे स्वतंत्र तपास पथक तयार केले होते. त्यापैकी युनिट ५ कडील अधिकारी व अंमलदार यांचे एक पथक गोपनीय माहितीचा आधार घेऊन शोध घेत होते. विशाल ढोरे हा इतर चार आरोपींना सोबत घेऊन महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नंदुरबार, धुळे व इतर ठिकाणी लपून गुंगारा देत होता.

युनिट ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे व सहकाऱ्यांना हे आरोपी नंदूरबारला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथक तातडीने नंदूरबारला पोहचले आणि पाच आरोपींना छापा घालून पकडण्यात आले. त्यांच्याकडून रोख रकमेसह वेगवेगळ्या कंपनीचे सिमकार्ड, २ चारचाकी मोटार जप्त करण्यात आल्या. या गुन्ह्यातल्या १३ पैकी ११ आरोपींना पकडण्यात यश आले आहे. मुख्य सूत्रधार रवींद्र बऱ्हाटे अद्याप फरार आहे. न्यायालयाने त्याला ‘फरारी’ घोषित केले आहे.

ही कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, प्रसाद लोणारे, उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे, प्रमोद टिळेकर, महेश वाघमारे, विशाल भिलारे, विनायक जाधव, प्रवीण काळभोर, अंकुश जोगदंड, विलास खंदारे, संजय दळवी, स्नेहल जाधव या पथकाने केली.

Web Title: 5 accomplices of Ravindra Barhate arrested from Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.