महिलेचा विनयभंग करणाऱ्या पंचायत समिती सदस्यासह ५ जणांना अटक; पोलीस ठाण्यात घातला गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 12:17 PM2020-12-10T12:17:46+5:302020-12-10T12:18:09+5:30
पोलिसांनी दिलेल्या सूचना न ऐकता महिलांच्या अंगावर धावून जाणे मारहाण करुन दमदाटी व शिवीगाळ केली.
पुणे : बेकायदेशीरपणे व्यावसायिक फायद्यासाठी नळ कनेक्शन घेण्यावरुन झालेल्या वादात सोसायटीमधील महिलांच्या अंगावर मारण्यासाठी धावून जाऊन तसेच घरात शिरुन तोडफोड करणारे पंचायत समिती सदस्य बाळासाहेब मोकाशी व त्यांचे पुत्रांसह उत्तमनगर पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. बुधवारी सकाळी शिवणे येथील सिद्धी विनायक मार्केट येथे झालेल्या या घटनेतील सर्वांना पोलिसांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात आणले. यावेळी बाळासाहेब मोकाशी यांनी पोलिसांच्या अंगावर धावून जाऊन शिवीगाळ केली. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
बाळासाहेब मोकाशी, शंतनु मोकाशी, ओंकार मोकाशी, अजित जमादार, विष्णु खत्री अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवणे येथील सिद्धी विनायक मार्केट या इमारतीच्या टेरेसचा दरवाजा बाळासाहेब मोकाशी यांनी आज सकाळी १० वाजता तोडला व ते बेकायदेशीरपणे स्वत:चे व्यावसायिक फायद्यासाठी पाणी कनेक्शन घेत होते. यावेळी सोसायटीमधील महिला सभासद यांच्यासोबत त्यांचा वाद झाला. तेव्हा मोकाशी, त्यांचा मुलगा शंतनु मोकाशी, पुतण्या ओंकार मोकाशी व त्यांचे इतर दोन साथीदार यांनी सोसायटीतील महिलांचे अंगावर मारण्यास धावून जाऊन अश्लील शिवीगाळ केली. सोहनलाल चौधरी यांचे घरात घुसुन त्यांना शिवीगाळ व मारहाण करुन डायनिंग टेबलावर पडलेल्या चाकूने मारण्याचा प्रयत्न केला. त्यांना घराबाहेर ओढून सर्व नागरिकांसमोर शिव्या दिल्या. काचेची बाटली फोडून चौधरी यांच्या मानेवर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने वार केला. तसेच महिलेला विवस्त्र करण्याची धमकी दिली. या घटनेची माहिती मिळताच उत्तमनगर पोलीस घटनास्थळी पोहचले.
पोलिसांनी दिलेल्या सूचना न ऐकता महिलांच्या अंगावर धावून जाणे मारहाण करुन दमदाटी व शिवीगाळ केली. पोलिसांनी त्यांना उत्तमनगर पोलीस ठाण्यात आणले. महिलेची तक्रार नोंदवत असताना बाळासाहेब मोकाशी याने तुम्ही माझ्यावर तक्रार नोंदवू नका. मी पंचायत समिती सदस्य आहे. तुमची वरिष्ठांकडे तक्रार करुन नोकरी घालवतो. तुमच्या गडचिरोलीला बदल्या करतो, असे जोरजोरात ओरडून पोलिसांच्या अंगावर धावून शिवीगाळ करुन पोलीस ठाण्यातील सार्वजनिक शांतता भंग करुन सरकारी कामात अडथळा आणला. त्यावरुन मोकाशी सह ५ जणांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.