पुण्यातील दत्तवाडी येथे झालेल्या गुंडांच्या खून प्रकरणी ५ जणांना अटक ; 'या'मुळे झाली होती हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 02:55 PM2021-07-13T14:55:54+5:302021-07-13T14:56:17+5:30
पुण्यातील दत्तवाडी परिसरात अक्षय किरतकर्वे या गुंडाची रविवारी सायंकाळी कोयत्याने सपासप वार करत हत्या करण्यात आली होती.
पुणे : पुण्यातील दत्तवाडी परिसरात अक्षय किरतकर्वे या गुंडाची चौघा जणांच्या टोळक्याने रविवारी सायंकाळी अक्षयवर कोयत्याने सपासप वार करत हत्या करण्यात आली होती. हत्या केल्यानंतर या चौघांनीही घटनास्थळावरुन पळ काढला होता. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून तो खून झाल्याचं पोलीस तपासात समोर असून पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी ४ गुन्हेगारांसह ५ जणांना अटक केली.
निखिल बाळ बोत्रे (वय ३०, रा. नवी पेठ), राकेश ऊर्फ रोहित प्रकाश खिलारे (वय ३७), प्रविण ऊर्फ पिल्या गणपत गाडे (वय ३१, रा. शांतीनगर, दांडेकर पुल), सुरज संजय बोत्रे (वय २९, रा. नवी पेठ), अमरदीप मुकुंद भालेराव (वय २८, रा. शांतीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
अक्षय शिवाजी किरतकर्वे (वय २५, रा. दांडेकर पुल, शांतीनगर, दत्तवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. अक्षय किरतकर्वे हाही पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहे. आरोपी व त्यांची सहा महिन्यांपूर्वी भांडणे झाली होती. अक्षय व त्याचा भाऊ ओंकार हे जुन्या दत्तवाडी रोडवरील ११ जुलै रोजी सायंकाळी पावणे सात वाजता जात होते. त्यावेळी जुन्या भांडण्यांच्या रागातून आरोपींनी कोयता, लाेखंडी रॉड व लाथाबुक्यांनी मारहाण करुन अक्षय याचा खून केला. यावेळी तेथे मोठी गर्दी जमली होती. लोकांनी त्याच्या मदतीला येऊ नये, म्हणून त्यांनी हातातील हत्यारांची भिती दाखवून दहशत निर्माण केली. मध्ये आल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याने लोकांनी दारे खिडक्या बंद केल्या होत्या.
आरोपींची माहिती मिळाल्यावर गुन्हे शाखेच्या युनिट ३ व दत्तवाडी पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली आहे.त्यांना न्यायालयात हजर केले असता आरोपींना २० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती सरकारी वकील किरण बेंडभर यांनी दिली.