वेल्हे तालुक्यात वीजेच्या धक्क्याने ५ म्हशींचा तडफडून मृत्यू; सुदैवाने मनुष्यहानी टळली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 04:05 PM2021-12-23T16:05:44+5:302021-12-23T16:06:47+5:30
तब्बल पाच लाखाहून अधिक रुपये किमंतीच्या म्हशींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्या शेतकरी कुटुंबावर उपासमारीची वेळ आली
मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील पानशेत येथील श्री शिवाजी वीर बाजी पासलकर विद्यालयाजवळ रस्त्यावर पडलेल्या वीजेच्या तारेचा जोरदार धक्का बसून पानशेत धरणमाथ्यावरील वांजळवाडी येथील धरणग्रस्त शेतकरी दिलीप सोनबा जागडे यांच्या पाच म्हशींचा एकापाठोपाठ तडफडून मृत्यू झाला. ही दुर्घटना आज बुधवारी घडली. तब्बल पाच लाखाहून अधिक रुपये किमंतीच्या म्हशींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने जागडे यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
पानशेत विभाग महाविजतरण व स्थानिक पशुसंवर्धन विभागाने घटनास्थळी जाऊन मुत म्हशींचा पंचनामा, शवविच्छेदन केले. महावितरणचे विशेष निमंत्रित सदस्य सुनील गायकवाड यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांस शासन निर्णयानुसार तातडीने मदत द्यावी अशी मागणी केली आहे. दिलीप यांचे वडील सोनबा जागडे हे म्हशींना रानात चारण्यासाठी चालले होते. त्यांच्या समोरच म्हशींना विजेचा धक्का बसला .सोनबा जागडे हे प्रसंगसावधनता दाखवत तेथून बाजूला गेले. या रस्त्यावर विद्यार्थ्यांंसह नागरिकांची ये जा सुरू असते. जागडे यांनी सर्वांना सावध केले त्यामुळे मनुष्य हानी टळली.
महावितरणचे पानशेत शाखा अभियंता नितीन धस म्हणाले, विद्यालयाजवळ असलेल्या वीजेच्या लोंखडी खांबांवरील एक तार जमिनीवर पडली. त्यावेळी तेथून जात असलेल्या म्हशींना वीजेचा धक्का बसून त्यांचा मुत्यू झाला. खांबावरील तारा सुस्थितीत आहेत. मात्र म्हशीने खांबाला धक्का दिल्यामुळे ताण बसून तार तुटून खाली पडली असावी.
शेतकरी शैलेश दिलीप जागडे म्हणाले, वीजेची तार अगोदरच पायी रस्त्यावर पडली होती. अजोबा सोनबा जागडे म्हशींना चारण्यासाठी घेऊन चालले होते. त्यावेळी पडलेल्या तारेच्या वीजेचा पुढे चालेल्या म्हशीला धक्का बसला. त्यामुळे म्हशीने हंबरडा फोडला. त्यामुळे दुसरी म्हैस तिच्या जवळ गेली. तिलाही वीजेचा धक्का दिला. असे एकापाठोपाठ पाच म्हशींना वीजेचा धक्का बसला. जोरदार हंबरडे फोडत तडफडून सर्वांचा मुत्यू झाला.
पानशेत पशुसंवर्धन विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आदेश निकम यांनी शवविच्छेदन.केले. सर्व पाच म्हशींचा मुत्यू झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. बाजारभावानुसार एका मृत म्हशीची किमंत एक लाख रुपये आहे. याप्रमाणे पाच म्हशींचे पाच लाख रुपये किंमतीचे नुकसान झाले आहे.