सराईत चोरट्यांकडून ५ गुन्हे उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:10 AM2021-07-21T04:10:15+5:302021-07-21T04:10:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने ५ जणांना अटक करुन त्यांच्याकडून ५ गुन्हे उघडकीस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने ५ जणांना अटक करुन त्यांच्याकडून ५ गुन्हे उघडकीस आणले आहेत. योगेश ऊर्फ पप्पू देवराव गोयकर (वय २६, रा. टिळेकरनगर, कोंढवा), विजय महादेव हुलगुंडे (वय २३, रा. कोंढवा), आकाश सहदेव हजारे (वय १९, रा. टिळेकरनगर, कोंढवा), महेश विजय महानवर (वय १९, रा. गोकुळनगर, कात्रज), परमेश्वर दिलीप काळे (वय १९, रा. कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ३ मोटारसायकली, १ मोबाईल असा १ लाख ९० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
पोलीस अंमलदार महेश वाघमारे व आश्रुबा मोराळे यांना कोंढव्यातील सराईत गुन्हेगार योगेश गोयेकर व त्याच्या दोन मित्रांकडे चोरीची मोटारसायकल आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कात्रज कोंढवा रोडवर सापळा लावला. तिघे जण ट्रिपल सीट आलेल्याचे पाहून त्यांना अडवून चौकशी केली. तेव्हा त्यांच्याकडील मोटारसायकल चोरीची असल्याचे आढळून आले. अधिक चौकशी केल्यावर त्यांनी पुणे शहरात मोबाईल व वाहनचोरीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले. ३ आठवड्यापूर्वी कात्रज कोंढवा रोडवर महेश महानवर आणि परमेश्वर काळे यांच्या मदतीने टेम्पोचालक व त्याच्या साथीदाराला कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील राेख रक्कम व मोबाईल चोरल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी दोघांना अटक केली. योगेश गोयकर याच्याविरुद्ध दौंड, कर्ज आणि इंदापूर पोलीस ठाण्यात जबरी चोरी, दरोड्याचे ४ गुन्हे दाखल असून त्यात तो फरार आहे. पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.