निवडणुकीच्या रणधुमाळीत कारमधील ५ कोटींची रोकड नेमकी कुणाची? राजकीय आरोप-प्रत्यारोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 01:38 PM2024-10-23T13:38:50+5:302024-10-23T13:39:18+5:30

कारमधील व्यक्ती म्हणते, ‘रोकड माझीच’

5 crore cash in the car in the battle of election, who exactly Political allegations | निवडणुकीच्या रणधुमाळीत कारमधील ५ कोटींची रोकड नेमकी कुणाची? राजकीय आरोप-प्रत्यारोप

निवडणुकीच्या रणधुमाळीत कारमधील ५ कोटींची रोकड नेमकी कुणाची? राजकीय आरोप-प्रत्यारोप

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: मुंबई-बंगळुरू मार्गावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर चारचाकीमध्ये सापडलेल्या  कोट्यवधी  रुपयांच्या रकमेचा ग्रामीण पोलिसांनी उलगडा केला आहे. पंचनाम्याअंती कारमधून  ५ कोटी ५०० ची राेकड जप्त केली आहे. मात्र, कारमधील व्यक्तीने सर्व रक्कम त्याचीच असल्याचा दावा केला असून, त्यासंबंधीचे पुरावे तो आयकर विभागाकडे जमा करणार आहे. ही कार अमोल नलवडे नावाच्या व्यक्तीची असल्याची माहिती मिळाल्याचे पुण्याचे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले.

सोमवारी खेड शिवापूर टोल नाका परिसरात एका कारमधून  मोठ्या प्रमाणावर रक्कम नेण्यात येत असल्याची माहिती पाेलिस पथकाला मिळाली होती.  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना संशयित वाहनांची तपासणी करीत आहेत. रात्री आठच्या सुमारास टोल नाक्याजवळ संशयित कार थांबविण्यात आली. त्यामध्ये सापडलेली रक्कम आयकर विभागाकडे जमा करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. संबंधित विभागांना त्याची माहिती देण्यात आलेली आहे. पोलिस व आयकर विभाग आपापल्या पातळीवर याचा तपास करणार आहेत, असे देशमुख यांनी सांगितले. 

‘मी तर कार विकली...’

पाच कोटी रुपये सापडलेली कार मी काही महिन्यांपूर्वीच बाळासाहेब आसबे नावाच्या व्यक्तीला विकली होती. त्यामुळे या प्रकरणाचा आणि माझा काहीही संबंध नाही. गाडी विकल्यानंतर मी त्या गाडीचे ऑनलाइन पैसे घेतले. आम्ही काही वर्षांपूर्वी ‘शेकाप’चे काम करायचो. मात्र, आता कोणत्याही पक्षाशी आमचा संबंध नाही, अमोल नलवडे यांनी सांगितले.

सत्ताधारी ॲम्बुलन्स, टँकरचा वापर पैशाच्या ट्रान्सपोर्टसाठी करणार आहेत. मुंबईहून पैसे पाठविले जात होते. एकूण ५ गाड्या होत्या. त्यात २५ ते ३० कोटी रुपये होते, असा अंदाज आहे. सत्ताधारी उमेदवारांना २५ कोटींचा पहिला हफ्ता मिळाला.
- रोहित पवार, आमदार

शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटी रुपये पकडल्याचे मला प्रसारमाध्यमातून समजले. कारमध्ये पकडलेल्या ५ कोटी रकमेशी माझा व माझ्या कुटुंबाचा काही संबंध नाही. तसेच कारमालक अमोल नलवडे हे पूर्वी ‘शेकाप’चे काम करायचे; परंतु आता शिंदेसेनेचे (माझे) काम करतात.
- शहाजीबापू पाटील, आमदार

मुख्यमंत्री शिंदे यांच्या पक्षातील एका आमदाराच्या गाडीत १५ कोटी रुपये सापडले. यातील ५ कोटी पकडले; पण बाकीचे पैसे आमदारांच्या घरापर्यंत पोहोचविले गेले. निवडणूक आयोगाची यंत्रणाच सत्ताधाऱ्यांनी हायजॅक केली आहे.
- रवींद्र धंगेकर, आमदार, काँग्रेस

Web Title: 5 crore cash in the car in the battle of election, who exactly Political allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.