५ कोटींचा जीएसटी चुकविणाऱ्या संचालकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:12 AM2021-03-05T04:12:46+5:302021-03-05T04:12:46+5:30
पुणे : कोणत्याही मालाची खरेदी-विक्री न करता सुमारे ३२ कोटी रुपयांची बनावट जीएसटी बिले बनवून ५ कोटींपेक्षाही जास्त जीएसटी ...
पुणे : कोणत्याही मालाची खरेदी-विक्री न करता सुमारे ३२ कोटी रुपयांची बनावट जीएसटी बिले बनवून ५ कोटींपेक्षाही जास्त जीएसटी चुकविणाऱ्या पुण्यातील जगदंबा एंटरप्रायजेसच्या संचालकाला जीएसटी आयुक्तालयाने अटक केली. नरेश बन्सल असे अटक केलेल्या संचालकाचे नाव आहे.
जगदंबा एंटरप्रायजेसच्या संचालकाने दिल्लीस्थित बनावट कंपन्यांकडून मालाची सुमारे ३२ कोटी रुपयांची बिले मिळवली. त्या बिलांच्या आधारे सुमारे ५.६ कोटी रुपयांचे बनावट जीएसटी क्रेडिट वापरून तयार मालाची बनावट बिले तयार केली. या संपूर्ण व्यवहारामध्ये कोठेही मालाची खरेदी विक्री न झाल्याने सुमारे ५ कोटी रुपयांपेक्षाही जास्त जीएसटी बुडविला गेला. त्याची सेंट्रल जीएसटी आयुक्तालयाने दखल घेऊन कंपनीवर छापा टाकला. संचालक नरेश बन्सल याची चौकशी केली. चौकशीमध्ये बन्सल याने या गुन्ह्याची कबुली दिली. त्याआधारे त्याला अटक करून २ मार्च रोजी शिवाजीनगर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या प्रकरणात संपूर्ण आर्थिक व्यवहाराची शहानिशा केली जात आहे, अशी माहिती जीएस आयुक्तालयाच्या मुख्यालय दक्षता पथकाचे उपायुक्त सचिन घागरे यांनी सांगितले.