Pune: बनावट सह्या करुन ५ कोटींचे कर्ज, वैशाली हॉटेलच्या मालकिणीची पतीविरोधात तक्रार
By विवेक भुसे | Published: October 4, 2023 03:48 PM2023-10-04T15:48:11+5:302023-10-04T15:48:48+5:30
वैशाली हॉटेलच्या मालकिणीने आपल्या पतीसह त्यांना कर्ज देणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दिली आहे...
पुणे : बनावट सह्या करुन बनावट दस्त तयार करुन फ्लॅट तारण ठेवून त्याद्वारे ४ कोटी ९७ लाख ५ हजार रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी वैशाली हॉटेलच्या मालकिणीने आपल्या पतीसह त्यांना कर्ज देणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दिली आहे.
याप्रकरणी निकिता जगन्नाथ शेट्टी (वय ३४, रा. मोदीबाग, शिवाजीनगर) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विश्वजीत विनायकराव जाधव (वय ४१), डी एस ए ( आर आर फायनान्सचे) रवी परदेशी आणि कोटक महिंद्रा बँक येरवडा शाखेचे मॅनेजर राजेश देवचंद्र चौधरी (वय ४२, रा. येरवडा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार फर्ग्युसन रोडवरील निकिता हॉस्पिटलिटी एलएलपीच्या कार्यालयात ७ डिसेबर २०२२ पासून आतापर्यंत घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकिता शेट्टी व विश्वजीत जाधव हे पतीपत्नी आहेत. फर्ग्युसन रोडवरील वैशाली हॉटेलच्या मालकीवरुन त्यांच्यात वाद निर्माण झाला असून त्यांनी एकमेकाविरुद्ध अनेक तक्रारी केल्या आहेत. आता फसवणुकीची तक्रार केली आहे.
फर्ग्युसन रोडवरील निकिता हॉस्पिटॅलिटी एलएलपी या कंपनीच्या कार्यालयात विश्वजीत जाधव याने बैठका घेऊन कट रचला. फिर्यादी यांच्या खोट्या सह्या करुन या सह्या खर्या असल्याचे भासवून त्यांच्या आधारे बनावट दस्त तयार केले. फिर्यादीच्या मालकीचा फ्लॅट त्यांच्या परवानगीशिवाय तारण ठेवून त्या बदल्यात कर्ज घेऊन ४ कोटी ९७ लाख ५ हजार रुपयांचा अपहार करुन फसवणूक केली. डेक्कन पोलिसांनी हा गुन्हा दाखल करुन अधिक तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे.