स्वाइन फ्लूने घेतले ५० दिवसांत ५ बळी
By admin | Published: February 20, 2015 12:35 AM2015-02-20T00:35:20+5:302015-02-20T00:35:20+5:30
स्वाइन फ्लूमुळे शहरात आतापर्यंत ५ जणांचे बळी घेतले आहेत. हे सर्व ३४ ते ४८ वयोगटांतील पुरुष आहेत. सध्या स्वाइन फ्लूच्या १७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
पिंपरी : स्वाइन फ्लूमुळे शहरात आतापर्यंत ५ जणांचे बळी घेतले आहेत. हे सर्व ३४ ते ४८ वयोगटांतील पुरुष आहेत. सध्या स्वाइन फ्लूच्या १७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ही संख्या वाढतच चालली आहे. महापालिका वैद्यकीय विभागाकडून प्रभावी उपाययोजना होत नाहीत.
वातावरणातील बदलामुळे आणि संसर्ग वाढल्याने शहरातील स्वाइन फ्लूच्या रुग्णात वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यापासून ही संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यात एकूण पाच जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. पिंपरीतील खासगी रुग्णालयात ४१ वर्षांच्या रुग्णाचा २४ जानेवारीला मृत्यू झाला. शहरातील स्वाइन फ्लूचा या वर्षातील पहिला बळी ठरला. मात्र, त्याच्या नातेवाइकांनी या आजाराने त्याचा मृत्यू झाल्याचा इन्कार केला आहे. व्यवस्थित उपचार न केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.
आंध्र प्रदेश येथील कृष्णा कुमारी या ४८ वर्षांच्या रुग्णाचा संत ज्ञानेश्वर रुग्णालयात ४ फेबु्रवारीला मृत्यू झाला. दोन दिवसांनी थेरगावच्या आदित्य बिर्ला मेमोरिअल रुग्णालयात तळेगाव दाभाडे येथील नीलेश देशपांडे या ३५ वर्षांच्या तरुणाचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. पाठोपाठ १० फेब्रुवारीला पिंपळे निलख येथील महालिंगम अलीमुत्ता या ४० वर्षांच्या व्यक्तीचा वायसीएम रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांच्यावरही काही दिवस बिर्ला रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथून वायसीएम रुग्णालयात दाखल करताच काही मिनिटांच त्याची प्राणज्योत माळवली.
मंगळवारी (दि. १७) केशवनगर, चिंचवड येथील ३४ वर्षीय अभियंता असलेले निशांत अनिल कारखानीस यांचा वायसीएम रुग्णालयात मृत्यू झाला. स्वाइन फ्लूच्या आजाराचे रुग्णांची संख्याही वाढतच आहे. शहरातील विविध रुग्णालयात १७ रुग्ण स्वाइन फ्लू बाधित आहेत. तसेच ५ रुग्ण संशयित रुग्ण आहेत. त्यापैकी वायसीएममध्ये २ तर १ संशयित रुग्ण उपचार घेत आहेत. बिर्ला रुग्णालयात सर्वांधिक ६ रुग्ण उपचारार्थ दाखल आहेत. निरामय रुग्णालयात २, मोरया रुग्णालयात १, स्टर्लिंग रुग्णालयात ३ व इतर रुग्णालयात २ रुग्ण उपचार घेत आहेत. आज गुरुवारअखेर ५, ३५७ जणांवर प्राथमिक उपचार केले.