पुणे महापालिकेच्या कारवाईत 5 कुटुंब बेघर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 05:03 PM2019-03-16T17:03:54+5:302019-03-16T17:05:01+5:30
पुणे महानगरपालिकेच्या वारजे क्षेत्रिय कार्यालयाकडून करण्यात आलेल्या कारवाईमध्ये डी पी रस्त्यावरील नवं सह्याद्री चाैकातील पाच घरे पाडण्यात आली आहेत.
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या वारजे क्षेत्रिय कार्यालयाकडून करण्यात आलेल्या कारवाईमध्ये डी पी रस्त्यावरील नवं सह्याद्री चाैकातील पाच घरे पाडण्यात आली आहेत. या ठिकाणी रस्त्याचे काम सुरु असून ही घरे रस्त्यात येत असल्याने पाडण्यात आली आहेत. या कारवाईमुळे येथील पाच कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. महापालिकेकडून या नागरिकांना इतर ठिकाणी घरे दिल्याचे सांगितले जात असले तरी घरे मिळाली नसल्याचे या नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच या भागात असणाऱ्या आणि एनजीटीकडून नाेटीस देण्यात आलेल्या अतिक्रमणांवर पालिकेकडून कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे गरीबांवरच कारवाईचा बडका का असा सवाल आता येथील नागरिक विचारत आहेत.
गेल्या पंन्नास वर्षांपासून येथे पाच कुटुंबे राहत आहेत. सध्या राजाराम पुलापासून डी पी रस्त्याच्या रंदीकरणाचे काम सुरु आहे. या रुंदीकरणामध्ये ही घरे बाधीत हाेणार हाेती. याबाबत पालिकेने या घर मालकांना नाेटीस दिली हाेती. 13 तारखेला दिलेल्या नाेटीसमध्ये घर रिकामे करुन पुनर्वसन केलेल्या ठिकाणी राहण्यास जावे असे आदेश पालिकेकडून देण्यात आले हाेते. पालिकेने घरेच दिली नसल्याचा आराेप येथील रहिवासी करत आहेत. काही वर्षांपूर्वी घरे देण्यात आली परंतु ती घरे सध्या येथे राहत असणाऱ्या कुटुंबीयांच्या आई वडीलांना देण्यात आली आहेत. त्याचबराेबर एसआरए कायद्यानुसार मुलांना देखील घरे देण्यात यायला हवीत असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. तसेच गेली 50 वर्षे याच ठिकाणी राहत असल्याचा दावा येथील कुटुंबे करत आहेत. महापालिकेने केलेल्या कारवाईमुळे ही कुटुंबे बेघर झाली असून जाेपर्यंत घरे मिळत नाहीत ताेपर्यंत येथेच बसून राहणार असल्याचा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे.
येथे राहणाऱ्या रेश्मा पवळ म्हणाल्या, गेल्या 50 वर्षांपासून आम्ही येथे राहताेय. 13 तारखेला आमच्या घरावर नाेटीस लावण्यात आली. काल आमची घरं बुलडाेझर आणून पाडण्यात आली. महापालिका म्हणते आम्हाला पुनर्वसनाअंतर्गत घरे देण्यात आली आहेत. प्रत्यक्षात आम्हाला कुठलिही घरे देण्यात आलेली नाहीत. ज्या घरांबाबात पालिका बाेलतीये ती घरे आमच्या सासू सासऱ्यांना देण्यात आली आहेत. अचानक करण्यात आलेल्या कारवाईमुळे आम्ही रस्त्यावर आलाे आहाेत. रस्त्यावर राहत असल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुलांच्या परीक्षा सुरु आहेत. आमचा संसारच उघड्यावर आला आहे.
तुकाराम एडके म्हणाले, काल घरी पुरुष मंडळी नसताना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आमची घरे पाडली. अधिकाऱ्यांनी याेग्य वर्तन केले नाही. घरातले सामान रस्त्यावर फेकून दिले. 13 तारखेला नाेटीस लावली आणि लगेच 15 तारखेला कारवाई करण्यात आली. मुलांच्या परीक्षा सुरु आहेत. महापालिका म्हणते तुमची दुसरीकडे व्यवस्था केली आहे, तुम्हाला घरे दिली आहेत. परंतु आम्हाला कुठलिही घरे दिलेलीच नाहीत. या कुटुंबाच्या फाईल्स महापालिकेकडे आहेत. त्यांना अद्याप घरे देण्यात आलेली नाहीत. असे असताना थेट कारवाई करण्यात आली. राजारामपूल ते म्हात्रे पुलादरम्यान असणारी बेकायदेशीर बांधकामे तशीच आहेत. त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. केवळ गरीबांवर कारवाई करण्यात येत आहे. महापालिका म्हणते तुमच्या आई वडीलांना घरे दिली आहेत, तिकडे जाऊन रहा परंतु आमची तिसरी पिढी येथे राहत आहे. आई वडीलांना देण्यात आलेल्या छाेट्याशा खाेल्यांमध्ये संपूर्ण कुटुंब राहणे शक्य नाही.
याविषयी बाेलताना पालिकेच्या वारजे क्षेत्रिय कार्यलयाचे अधिकारी गणेश साेनूने म्हणाले, यापूर्वी तीन वेळेला त्यांना नाेटीस देण्यात आली हाेती. त्यांना घरे देण्यात आल्याची माहिती सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे. सर्व नियमानुसार कारवाई करण्यात आलेली आहे. ज्या दाेन कुटुंबांना घरे देण्याचे बाकी हाेते त्यांच्यासाठी तात्पुरत्या निवासाची साेय करण्यात आली आहे.