गोडावूनमधून ५ लाखांची रोकड लंपास
By admin | Published: May 12, 2014 02:49 AM2014-05-12T02:49:35+5:302014-05-12T02:49:35+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस बाळासाहेब अटल यांच्या एजन्सीचे गोडावून फोडून चोरट्यांनी ५ लाख ५४ हजारांची रोकड लंपास केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस बाळासाहेब अटल यांच्या एजन्सीचे गोडावून फोडून चोरट्यांनी ५ लाख ५४ हजारांची रोकड लंपास केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाढत्या घरफोड्या, चोर्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ब्रिजमोहन ऊर्फ बाळासाहेब शिवलाल अटल (४९, रा. महर्षीनगर) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मार्केट यार्ड येथील आदर्शनगर सोसायटीमधील निकम हाऊस इमारतीमध्ये तळमजल्यावर त्यांचे गोडावून आहे. त्यांच्याकडे कोकाकोला कंपनीची एजन्सी आहे. हे गोडावून शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास कुलूप लावून बंद केले. दुसर्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास गोडावून उघडल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले. गोडावूनमधील लोखंडी ग्रीललगत ठेवलेल्या कपाटाच्या तिजोरीच्या कप्प्याच्या मागील बाजूचा पत्रा उचकटण्यात आला होता. तिजोरीमध्ये ठेवलेले ५ लाख ५४ हजार रुपये चोरट्यांनी लांबवले. गेल्या काही दिवसांत स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घरफोड्या आणि चोर्यांसोबतच बेकायदेशीर धंदे वाढत चालले आहेत. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात पोलीस कमी पडत आहेत. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले पोलीस कर्मचारी सध्या ‘वेगळ्या’च कामामध्ये व्यस्त आहेत. बेकायदा धंदे, हॉटेलचालक, व्यापारी, अनधिकृत व्यवसायांवर लक्ष केंद्रित केलेल्या पोलिसांना नागरिकांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल का, असा प्रश्न विचारला जात आहे. (प्रतिनिधी)