पुण्यातील मार्केटयार्डात कोयत्याचा धाक दाखवून भरदुपारी ५ लाख लुटले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 03:35 PM2018-11-06T15:35:06+5:302018-11-06T15:36:38+5:30
पेट्रोलपंपावरील जमा झालेली रोकड बँकेत भरण्यासाठी दुचाकीवरुन जाणाऱ्या व्यक्तीला दोघांना कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील ५ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग जबरदस्तीने चोरुन नेली़.
पुणे : पेट्रोलपंपावरील जमा झालेली रोकड बँकेत भरण्यासाठी दुचाकीवरुन जाणाऱ्या व्यक्तीला दोघांना कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील ५ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग जबरदस्तीने चोरुन नेली़. ही घटना गंगाधाम चौक ते मार्केटयार्ड दरम्यानच्या बुधाणी कॉलनी जवळच्या गल्लीत दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली़. मार्केटयार्डात गर्दी असताना हा प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे़ .
याबाबत पोलिसांनी सांगितले की, गंगाधाम चौकात पेट्रोल पंप आहे़. या पेट्रोलपंपावरील रोकड बँकेत जमा करण्याचे काम शेख महंमद हुसेन हे करत असतात़. नेहमीप्रमाणे आज सकाळी ते पेट्रोल पंपावर आले़. त्यांनी पेट्रोल पंपावर जमा झालेली ४ लाख ७५ हजार रुपये एका बँगेत भरले व ते पावणे बाराच्या सुमारास मार्केटयार्ड येथील स्टेट बँकेत भरणा करण्यासाठी दुचाकीवरुन निघाले़. दुचाकीला त्यांनी पुढे पैशाची बॅग लावली होती़. गंगाधाम चौकातून मार्केटयार्डला येताना ते कडेच्या बुधाणी कॉलनीतील गल्लीतून जात असताना अचानक काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरुन दोघे जण आले. त्यांनी मोटारसायकल त्यांना आडवी घातली. त्यामुळे त्यांना थांबायला लागले. तेव्हा एकाने त्यांच्या गळ्याला कोयता लावला़ दुसऱ्याने दुचाकीच्या हँडलला असलेली पैशाची बॅग जबरदस्तीने काढून घेतली आणि तिथून ते पसार झाले.
दिवाळीनिमित्त मार्केटयार्डमध्ये सध्या गर्दी असते. असे असताना चोरट्यांनी त्यांचा पाठलाग करुन ते आडबाजूच्या रस्त्यावर गेल्यावर डाव साधल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. या रस्त्यावरील सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे.