एसीपीसाठी मागितले पाच लाख, १ लाख घेताना नातलगास अटक, फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी घेतली लाच

By विवेक भुसे | Published: February 18, 2024 10:02 PM2024-02-18T22:02:25+5:302024-02-18T22:02:45+5:30

ओंकार भरत जाधव (वय ३२, रा. वस्तुविवा सोसायटी, वाकड) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

5 lakhs demanded for ACP, relative arrested while taking 1 lakh, bribe taken to avoid filing fraud case | एसीपीसाठी मागितले पाच लाख, १ लाख घेताना नातलगास अटक, फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी घेतली लाच

एसीपीसाठी मागितले पाच लाख, १ लाख घेताना नातलगास अटक, फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी घेतली लाच

पुणे : जागेच्या खरेदी-विक्री व्यवहारात कमी किमतीत जागा विक नाही तर फसवणुकीचा गुन्हा दाखल करीन, अशी भीती घालून सहायक पोलिस आयुक्तांकरिता ५ लाख रुपयांची लाच मागण्यात आली. त्यातील पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपये घेताना एसीपीच्या नातेवाइकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ओंकार भरत जाधव (वय ३२, रा. वस्तुविवा सोसायटी, वाकड) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत एका ३२ वर्षीय जमिनीची खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे. त्यांचा कात्रज काेंढवा रोडवरील एक जमिनीचा व्यवहार निगडी येथील कुटुंबासोबत १२ कोटी रुपयांना ठरला होता. त्यापैकी ३ कोटी टोकन रक्कम देण्याचे ठरले. पैकी त्यांना १ कोटी २० लाख रुपये दिले. त्या जागेची किंमत ७ कोटी रुपये केली. तक्रारदार यांनी व्यवहार पूर्ण करण्याकरिता नोटीस पाठविली. तेव्हा प्रतिवादीने पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात तक्रारदारांविरुद्ध तक्रार केली. सहायक पोलिस आयुक्त मुगुटलाल पाटील यांच्याकडे चौकशीसाठी हा अर्ज आला.

१४ फेब्रुवारी रोजी त्यांनी तक्रारदार यांना बोलावून तुझ्याविरुद्ध ४२०चा गुन्हा दाखल करू शकतो. तू ही जागा ३ कोटी ९० लाख रुपयांत विक्री कर, असे म्हटले. इतक्या कमी किमतीला विकणार नसल्याचे तक्रारदार यांनी सांगितले. तेव्हा पाटील याने तू जेलमध्ये जायची तयारी ठेव. तेव्हा तक्रारदार यांनी त्यांचीच फसवणूक झाली असल्याचे सांगितले. त्यावर त्यांनी मी तुला वाचवू शकतो. त्यावेळी केबिनमध्ये बसलेल्या ओंकार जाधव याच्याकडे बोट करून ते माझे नातेवाईक आहेत. त्याच्याशी बोला, बाहेर चर्चा नको, असे सांगितले. त्यानंतर तक्रारदार यांना जाधव याने फोन करून पाटील याने ५ लाख रुपयांची मागणी केल्याचे सांगितले. त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. त्याची पडताळणी करताना जाधव याने तक्रारदार यांना सदानंद हॉटेलसमोर रोडवर बोलावून मुगुटलाल पाटील याच्याशी बोलणे करून दिले. त्यानंतर पाच लाखांपैकी पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपये देण्याची मागणी केली. जहांगीर हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये तक्रारदाराकडून एक लाख रुपये स्वीकारताना ओंकार जाधव याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. सहायक पोलिस अधीक्षक नतीन जाधव, पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे, सहायक फौजदार मुकुंद अयाचित, हवालदार चंद्रकांत जाधव, पोलिस अंमलदार दिनेश माने यांनी ही कारवाई केली.

Web Title: 5 lakhs demanded for ACP, relative arrested while taking 1 lakh, bribe taken to avoid filing fraud case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.