धरण साखळीत जमला ५ महिन्यांचा पाणीसाठा
By admin | Published: July 6, 2016 03:23 AM2016-07-06T03:23:21+5:302016-07-06T03:23:21+5:30
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने मंगळवारी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर ओसरला आहे. दरम्यान, दिवसभरात
पुणे : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने मंगळवारी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर ओसरला आहे. दरम्यान, दिवसभरात पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे आजही धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात परिसरातील नाले, ओढ्यांमधून पाणी येणे सुरूच होते. त्यामुळे चारही धरणांमधील पाणीसाठ्याने ५.४९ टीएमसीची पाणीपातळी गाठली असून, हे पाणी शहराला पुढील पाच महिने पुरेल एवढे असल्याचे महापालिका, तसेच पाटबंधारे विभागाने सांगितले.
शनिवार (दि.२) पासूनच या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झालेली होती. रविवारी आणि सोमवारी पावसाचा जोर अधिक असल्याने शनिवारी सकाळी १.४१ टीएमसीपर्यंत खाली आलेला पाणीसाठा आज ५.५० टीएमसीवर पोहोचला आहे. शनिवारी या धरणसाखळीतील टेमघर धरणात ०.००, तर वरसगाव धरणात अवघा ०.०९ टीएमसी पाणी शिल्लक होते. मात्र, अवघ्या दोन दिवसांच्या पावसानेच टेमघर धरणात 0.३२ टीएमसी, तर वरसगाव धरणात १.८१ टीएमसी पाणी साठले
असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
दोन दिवसांत मिटला प्रश्न
या चारही धरणांमध्ये झालेल्या पावसाने पुणे शहराला पुढील पाच महिने पुरेल एवढा पाणीसाठा तयार झालेला आहे. शहराला दरदिवशी महापालिकेकडून ० .०३ टीएमसी पाणी पाटबंधारे विभागाकडून घेतले जाते. त्यामुळे महिन्याला शहराला सरासरी ०.९० टीएमसी पाण्याची आवश्यकता असते. मात्र, जून महिना कोरडा गेल्याने धरणांमध्ये असलेले पाणी हे जुलैअखेरपर्यंत पुरेल एवढेच होते. मात्र, आता हे पाणी शहरास डिसेंबर २०१६ अखेरपर्यंत पुरेल एवढे आहे.