दाम्पत्याच्या खुनाच्या तपासासाठी ५ पथके
By admin | Published: August 29, 2016 03:26 AM2016-08-29T03:26:22+5:302016-08-29T03:26:22+5:30
साकोरी शिवारातील पानसरेमळा येथे घरात दाम्पत्याचा कुऱ्हाडीने डोक्यात घाव घालून खून केलेल्या घटनेच्या तपासासाठी ५ पोलीस पथके परिसरात व अहमदनगर जिल्ह्यात रवाना झाली आहेत.
आळेफाटा : साकोरी शिवारातील पानसरेमळा येथे घरात दाम्पत्याचा कुऱ्हाडीने डोक्यात घाव घालून खून केलेल्या घटनेच्या तपासासाठी ५ पोलीस पथके परिसरात व अहमदनगर जिल्ह्यात रवाना झाली आहेत. घटनेच्या निषेधार्थ रविवारी साकोरी ग्रामस्थांनी बंद पाळत या घटनेतील आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी केली.
पानसरेमळा येथे बंद घरात पती-पत्नीचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले शनिवारी आढळून आले होते. मृतदेहाशेजारी कुऱ्हाड; तसेच लगतच्या शेतात कपडे, पेटी आदी वस्तू सापडल्याने चोरीस प्रतिकार करताना या दाम्पत्याचा चोरट्यांनी खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.
ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव, अपर पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे यांनी भेट देऊन तपासाविषयी सूचना केल्या. सायंकाळी श्वानपथक ठसेतज्ज्ञ व फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी आले. श्वान पथकाने घरापासून काही अंतरावरच माग काढला, तर घटनास्थळी असलेल्या रक्ताचे नमुने घेऊन परीक्षणासाठी पाठविण्यात
आले. याबाबत माहिती देताना पोलीस उपअधीक्षक जयश्री देसाई व पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी सांगितले, की तपासासाठी ५ पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत. परिसरात व पुणे जिल्ह्यात दोन, तर शेजारील अहमदनगर जिल्ह्यात दोन पथके रवाना झाली आहेत. गुन्हा अन्वेषण विभागाचे पथकही तपास करीत आहे. (वार्ताहर)