दिल्लीतील संमेलनाला ५ हजार मराठी रसिक येणार! यंदाच्या परिसंवादात 'हे' विषय ऐकायला मिळणार
By श्रीकिशन काळे | Published: October 13, 2024 05:54 PM2024-10-13T17:54:38+5:302024-10-13T17:55:00+5:30
रसिकांना संमेलनात काही त्रास होणार नाही, याबाबत संयोजकांकडून विशेष काळजी घेतली जाणार
पुणे : दिल्लीमध्ये आगामी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्यासाठी देशभरातून आणि महाराष्ट्रातून सुमारे पाच हजार रसिक येण्याचा अंदाज संयोजकांनी व्यक्त केला आहे. संमेलनासाठी तालकटोरा इनडोअर स्टेडिअम स्थळ निश्चित केले असून, दिल्लीमध्ये रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम असणार नाही, त्या दृष्टिकोनातून या संमेलनाचे नियोजन होणार आहे.
मराठी भाषिकांसाठी दिल्ली येथे होणारे संमेलन गौरवशाली असणार आहे. दरवर्षी संमेलनामध्ये विविध परिसंवाद होत असतात. एकावेळी तीन ते चार मंडपांमध्ये कार्यक्रम होत असतात. ग्रंथप्रदर्शनासाठी स्वतंत्र मांडव टाकलेला असतो. गेल्यावर्षी अमळनेरला संमेलन झाले. तेव्हा जवळपास सर्वच मांडवांमध्ये खूप अंतर होते. त्यामुळे रसिकांना एका मांडवातून दुसरीकडे जाण्यासाठी त्रास सहन करावा लागला. पण आता दिल्लीतील संमेलनात तसा त्रास होणार नाही. कारण दिल्लीतील तालकटोरा स्टेडिअमच्या परिघातच संमेलनाचे सर्व मांडव उभे असणार आहेत.
दिल्लीमध्ये मराठी भाषिक लोक सुमारे पाच लाखांहून अधिक आहेत. तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे आहेत. या संमेलनाला येणाऱ्यांची निवास व्यवस्था महाराष्ट्र सदन, इंडिया इंटरनॅशनल सेंटर, जैन भवन आदी ठिकाणे करण्याचे नियोजन होत आहे. त्यासाठी संयोजक सरहद संस्था प्रयत्न करत आहे. दिल्लीमध्ये अनेक मराठी सनदी अधिकारी, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी आहेत. त्यांच्यासह संमेलनाला एकूण पाच हजार रसिक येतील, अशी अपेक्षा आहे. नेहमीच्या संमेलनात रात्री उशिरापर्यंत रंगणारी कविसंमेलने आणि सांस्कृतिक कार्यक्रमही दिल्लीत होणार नाहीत. ते सायंकाळी संपविण्याचा प्रयत्न असणार आहे. संमेलनामध्ये बहुभाषिक आणि निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे.
परिसंवादाचे विषय !
देशाचे राजकारण आणि मराठी साहित्य, मराठी आणि महाराष्ट्र धर्म, लेखक राजकारण्यांशी मनमोकळा संवाद, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता, बृहन्महाराष्ट्रातील साहित्यनिर्मिती आणि जीवन, मराठीचा अमराठी संसार, परिचर्चा-आनंदी गोपाळ या पुस्तकावर, अनुवादावर परिसंवाद, मधुरव हा विशेष कार्यक्रम असणार आहे.