जिल्ह्यात ५ हजार पोलीस तैनात
By admin | Published: October 11, 2014 06:44 AM2014-10-11T06:44:46+5:302014-10-11T06:44:46+5:30
जिल्ह्यातही मतदान प्रक्रियेसाठी तब्बल पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
पुणे : जिल्ह्यातही मतदान प्रक्रियेसाठी तब्बल पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. ग्रामीण पोलिसांनी आतापर्यंत साडेपाच कोटींची रोकड, ६ हजार लिटर बेकायदा दारू, एक लाख लिटर रसायन जप्त केल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांनी दिली. ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत ३ हजार ४५० केंद्रांवर मतदान होणार आहे. या प्रत्येक केंद्रावर कर्मचारी असणार आहे. पोलिसांच्या दृष्टीने संवेदनशील असे एकही मतदान केंद्र नाही. परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार ८३ संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त देण्यात आला आहे. ३ हजार ४५० मतदान केंद्रांचे ६, ९, १२ केंद्रांचे मिळून विभाग करण्यात आले आहेत.
प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये ग्रामीण मतदानाच्या दिवशी जिल्हा अधीक्षक मनोज लोहिया, अतिरिक्त अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, विजयकुमार मगर यांच्यासह उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचारी असा २ हजार ४५० पोलिसांची फौज बंदोबस्तात असणार आहे. तर, ग्रामीण पोलिसांना एक हजार ३० होमगार्ड, एक हजार ८०० पोलीस कर्मचारी आणि एक अतिरिक्त अधीक्षक असे २ हजार ८०० पोलिसांचे अतिरिक्त मनुष्यबळ मदतीसाठी उपलब्ध झालेले आहे. (प्रतिनिधी)