पुणे : पीएमपीएमएलचा ब्रेक फेल झाल्यानं 5 गाड्यांना बसली धडक, विचित्र अपघातात एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2017 12:50 PM2017-11-06T12:50:29+5:302017-11-06T13:57:06+5:30
पुण्यामध्ये 5 वाहनांचा विचित्र अपघात घडला आहे. पीएमपीएमएलचा ब्रेक फेल झाल्यानं या बसची 5 वाहनांना धडक बसली.
पुणे - बिबवेवाडी (पुणे ) - प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अतिक्रमणाने व्यापलेल्या अप्पर-अंबामाता रस्त्यावर भर चौकात पीएमटीचा ब्रेक निकामी झाल्याने 7 वाहनांचा विचित्र अपघात झाला. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सोमवारी (6 नोव्हेंबर) सकाळी ११.४५ वाजण्याच्या अप्पर डेपोमधून शिवाजीनगरकडे जाणा-या पीएमपीचा ( एमएच १४ सीडब्लू १७२३) ब्रेक निकामी झाला. या पीएमपीने कोल्ड्रिंकने भरलेल्या टेम्पोला जोरात धडक दिली. कोल्ड्रिंकचा हा टेम्पो दुस-या मालवाहतूक करणा-या टेम्पोला जाऊन धडकला. यानंतर हा मालवाहतूक करणारा टेम्पो सुखसागरनगरला जाणारी पीएमपीला (एमएच १२ एफसी ९४७) धडकला.
या धडकेत दोन बाईक पीएमपीच्या खाली गेल्या व त्यातीलच एका बाईकस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य पाच जण गंभीर जखमी झालेत. बिबवेवाडी पोलिसांनी तातडीने जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. क्रेनच्या सहाय्याने सर्व गाड्या बाजूला काढून पोलिसांनी रस्ता मोकळा करुन दिला. हा अपघात घडला त्याचवेळी मुक्तांगण शाळेची बसदेखील त्या ठिकाणी आली होती. मालवाहतूक टेम्पोचा पुढील भाग पीएमपीच्या आत अडकल्यामुळे या स्कूल बसला समोरच्या बाजूने जोराची धडक बसली. सुदैवानं बसमधील विद्यार्थांना काहीही झालेले नाही. या विचित्र अपघातामुळे शाळकरी मुलं घाबरली होती.
या अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना व मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना पीएमपी विभागाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक नगरसेविका रुपाली धाडवे यांनी केली आहे. नगरसेवक बाळासाहेब ओसवाल, दिनेश धाडवे, मनोज देशपांडे यांनी घटनास्थळाला तातडीने भेट दिली. हा अपघात होण्याचे मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेला हा पूल. तसेच येथील अतिक्रमणे. याविषयी 'लोकमत'ने वेळोवेळी आवाजदेखील उठवला होता. मात्र पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे व येथील स्थानिक नेत्यांचा अधिका-यांवर नसलेल्या वचकामुळे येथील समस्या सोडवली जात नाही. त्याचा परिणाम म्हणून दररोज होणा-या अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत.