भटक्या कुत्र्याने ५ वर्षीय मुलावर हल्ला; गंभीर जखमी मुलाला पडले साठ टाके
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 01:29 PM2023-10-04T13:29:45+5:302023-10-04T13:30:04+5:30
कुत्र्याच्या चाव्यावर उपचाराला उशीर करू नये, अन्यथा उपचार वेळेवर न मिळाल्यास कुत्र्याचा चावा गंभीर स्वरूप धारण करण्याची भीती आहे.
बारामती : कळस (ता. इंदापूर) परिसरात सोमवारी (दि. २) पाच वर्षीय मुलावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुलाच्या फाडलेल्या गालावर ५९ टाके घालत त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. येथील श्रीपाल हॉस्पिटलच्या डॉ. राजेंद्र मुथा व डॉ. सौरभ मुथा या पिता-पुत्रांनी प्रयत्नांची शिकस्त करत त्या मुलावर यशस्वी उपचार केले.
या घटनेने परिसर हेलावून गेला आहे. कळस येथे वास्तव्यास असणाऱ्या कुटुंबातील पाच वर्षीय मुलावर सोमवारी सकाळी ६ वाजताच भटक्या कुत्र्याने हल्ला करीत त्याचा चावा घेतला. यामध्ये त्या मुलाचा गाल, ओठ अक्षरश: फाटले. यात तो गंभीर जखमी झाला. त्याच अवस्थेत पालकांनी त्याला सकाळी ७ वाजता श्रीपाल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले. डॉ. राजेंद्र मुथा व डॉ. सौरभ मुथा, डाॅ. ऋषी स्वामी, डाॅ. प्रियांका मुथा यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत त्याच्यावर तातडीने उपचार सुरू केले. त्याला जवळपास ५९ टाके घालत त्यावर यशस्वी उपचार केले. यावेळी मुलाच्या वडिलांनी ‘तुम्ही मसिहा आहात’ अशा शब्दात डाॅक्टरांचे आभार मानले.
याबाबत डाॅ. साैरथ मुथा यांनी सांगितले की, परिसरातील भटक्या कुत्र्यांबाबत पालकांनी दक्ष असणे आवश्यक आहे. कुत्र्याने मुलांना चावा घेण्याचा प्रकार घडल्यास तातडीने डाॅक्टरांशी संपर्क साधावा. कुत्र्याच्या चाव्यावर उपचाराला उशीर करू नये. अन्यथा उपचार वेळेवर न मिळाल्यास कुत्र्याचा चावा गंभीर स्वरूप धारण करण्याची भीती आहे.