Corona Rules: पुण्यातील नाट्यगृहात ५० टक्के उपस्थिती; नियम मात्र ५० लोकांचाच, व्यवस्थापक संभ्रमात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 02:26 PM2022-01-13T14:26:43+5:302022-01-13T14:27:05+5:30
कार्यक्रमांना ५० लोकांच्याच उपस्थितीचाच नियम असल्याचे महापालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे यांनी स्पष्ट केले
पुणे : नाट्यगृहांमध्ये नाटकांच्या प्रयोगांसाठीच केवळ ५० टक्के क्षमतेचा नियम लागू आहे. इतर सांस्कृतिक, धार्मिक राजकीय कार्यक्रमांसाठी नाही. या कार्यक्रमांना ५० लोकांच्याच उपस्थितीचाच नियम असल्याचे महापालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे यांनी स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या वतीने जानेवारी ते एप्रिल अशा चारमाही तारखांचे वाटप करण्यात आले आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासनाने नाट्यगृहांमध्ये ५० टक्के क्षमता आणि बाहेरील बंदिस्त सभागृहातील कार्यक्रमांना ५० लोकांच्या उपस्थितीचा नियम लागू केला आहे; परंतु प्रशासनाच्या नियमावलीमध्ये त्याबाबत स्पष्टता नसल्याने आयोजकांनी नाट्यगृहांमध्ये सरसकट कार्यक्रमांनाही ५० टक्के क्षमतेचा नियम लागू असल्याचे गृहीत धरले. ही बाब एका कार्यक्रमामुळे निदर्शनास आल्याने महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. बिबवेवाडीच्या अण्णाभाऊ साठे नाट्यगृहामध्ये एक राजकीय कार्यक्रम ५० टक्के क्षमतेच्या उपस्थितीत पार पडला. पोलीस बंदोबस्त असूनही प्रशासनाच्या नियमामुळे तेही हतबल झाले. ही बाब बालगंधर्व रंगमंदिराचे व्यवस्थापक सुनील मते यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यानंतर नियमामध्ये सुस्पष्टता आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या.
आगामी काळात नाट्यगृहांमध्ये राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. त्या पार्श्र्वभूमीवर महापालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे यांनी नाट्यगृहांमध्ये राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ५० लोकांच्याच उपस्थितीची मर्यादा घातली असून, तशा सूचना नाट्यगृह व्यवस्थापकांना दिल्या आहेत.
''यापुढील काळात नाट्यगृहांमध्ये राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम करायचे झाल्यास ५० लोकांच्याच उपस्थितीचा नियम आयोजकांना पाळावा लागणार आहे. ५० टक्के क्षमतेचा नियम केवळ नाट्यप्रयोगांना लागू असेल, असे वारुळे यांनी सांगितले.''