Pune Ganeshotsav: पुण्यात गणेश मंडळाच्या मिरवणुकीत एका पथकात ५० ढोल अन् १० ताशा; नवीन मंडळांसाठी 'या' अटी - शर्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 03:33 PM2024-08-18T15:33:42+5:302024-08-18T15:35:41+5:30
विसर्जनावेळी दोन मंडळांमध्ये अंतर पडू न देता मिरवणूक प्रवाही राहण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे
पुणे: पुण्यातील गेणशोत्सवात (Pune Ganeshotsav) पोलिसांकडून मंडळांना मिरवणूक, वाहतूककोंडी याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच नव्या मंडळाच्या परवानगीसाठी असलेल्या अटी-शर्ती यांची यादी पोलिसांनी जाहीर केली आहे. यंदा गणेश मंडळाच्या मिरवणुकीत एका पथकात (Dhol Pathak) ५० ढोल अन् १० ताशांना पोलिसांकडून परवानगी देण्यात आली आहे. तर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी परिसरातील मैदाने, शाळा या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी पोलिसांनी केली आहे. (Pune Police)
ढोल पथकांची संख्या निश्चित करा..
गेल्यावर्षी एका गणेश मंडळाच्या मिरवणुकीत एका ढोल पथकात ५० ढोल आणि १० ताशा अशी संख्या निश्चित करण्यात आली होती. यंदा देखील तीच संख्या निश्चित करण्यात आली असून, जास्तीत जास्त ३ ढोल पथकांचा समावेश गणेश मंडळांना करता येणार आहे. ती संख्या निश्चित करून पोलिसांना सांगा, अशा सूचनादेखील गणेश मंडळांना करण्यात आल्या आहेत.
पोलिसांकडून आम्हाला सकारात्मक सहकार्य..
शहरातील प्रमुख गणेश मंडळांनी पोलिसांकडून आम्हाला सकारात्मक सहकार्य मिळत असून, मंडळांनी देखील पोलिसांना सकारात्मक सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले. गणेशोत्सवाच्या काळात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी परिसरातील मैदाने, शाळा या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी गणेश मंडळांनी पोलिसांकडे केली.
नवीन मंडळांच्या परवानगीसाठी असलेल्या अटी-शर्ती..
- २०२२ मध्ये परवानगी घेतलेल्या गणेश मंडळांना २०२६ पर्यंत (५ वर्षे) परवानगी.
- नवीन गणेश मंडळांची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी व त्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे.
- मिरवणुकीत देखाव्यांची उंची जमिनीपासून १४ फुटांपेक्षा जास्त आणि रुंदी १० फुटांपेक्षा जास्त नसावी.
- रात्री १० पर्यंत कार्यक्रमांना परवानगी.
- कमान, स्टेज आणि मंडप उभारण्यासाठी अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र, वाहतूक शाखेचे, विद्युत जोडणीसाठी विद्युत निरीक्षकाचे प्रमाणपत्र यासाठी एक खिडकी योजना.
- परवानगी घेतलेल्या आकाराचाच मंडप उभारणे आवश्यक.
- गणेश मंडळात सीसीटीव्ही असणे बंधनकारक.
- महिलांची छेडछाड होणार नाही याची याबाबत दक्षता ठेवणे गरजेचे.
- धार्मिक भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घेणे गरजेचे.
- प्रखर बीम लाइट नको.
- दोनच स्पीकर लावून आवाजाची मर्यादा पाळावी.
गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी अधिक सुधारणा केल्या जाणार आहेत. गणेशोत्सवाच्या काळात वाहतुकीचे नियोजन चांगल्या प्रकारे केले जाणार आहे. विसर्जनावेळी दोन मंडळांमध्ये अंतर पडू न देता मिरवणूक प्रवाही राहण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. जेणेकरून विसर्जन मिरवणूकदेखील वेळेत संपेल. शहरातील गणेशोत्सव शांततेत व निर्विघ्न पार पडावा, यासाठी पोलिस दल सज्ज आहे. - संदीपसिंह गिल, पोलिस उपायुक्त, परिमंडळ १